

न्यूयॉर्क : आज जगभरात लाखो लोक रोज ChatGPT, Gemini आणि Grok यासारख्या AI टूल्सचा वापर मार्गदर्शन घेण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी करत आहेत. आतापर्यंत लोक स्मार्टफोन किंवा स्क्रीन उपकरणांद्वारे या AI टूल्सचा वापर करत होते; पण आता तंत्रज्ञान याहून एक पाऊल पुढे गेले आहे. कॅलिफोर्नियातील एका स्टार्टअपने ‘Friend 2.0’ नावाचे एक स्मार्ट ‘एआय पेंडंट’ (गळ्यातील लॉकेट) लाँच केले आहे. हे पेंडंट गळ्यात घालताच एखाद्या खऱ्या मित्राप्रमाणे तुमच्याशी बोलून संवाद साधू लागते.
एकटेपणा दूर करण्याचा दावा करणारे हे डिव्हाईस नेमके कसे काम करते, याचे फीचर्स काय आहेत आणि इंटरनेटवर यावरून वाद का सुरू आहे, ते जाणून घेऊया... डिजिटल युगात एकटेपणा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे आणि आता तंत्रज्ञान यावर एक अनोखा उपाय शोधल्याचा दावा करत आहे. याच उद्देशाने ‘Friend 2.0 AI पेंडंट’ बाजारात आणण्यात आले आहे. कॅलिफोर्नियातील या स्टार्टअपने सर्वप्रथम २०२४ मध्ये ‘Friend’ नावाने आपले पहिले एआय पेंडंट लाँच केले होते. आता कंपनीने याचे अपडेटेड मॉडेल Friend 2.0 लाँच केले आहे. या नव्या पेंडंटची किंमत २४९ डॉलर्स (सुमारे २१,००० रुपये) ठेवण्यात आली असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ते खरेदी करता येईल.
आधीचे एआय पेंडंट फक्त तुमचे बोलणे ऐकून टेक्स्ट मेसेजद्वारे उत्तर द्यायचे. मात्र, Friend 2.0 मध्ये इन-बिल्ट स्पीकर देण्यात आला आहे, म्हणजेच आता हा तुमच्याशी थेट बोलू शकेल. Alexa किंवा Siri सारख्या व्हॉईस असिस्टंटपेक्षा हे डिव्हाईस पूर्णपणे वेगळे आहे. प्रत्येक पेंडंटचे स्वतःचे वेगळे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व असेल. यूजर्स ते स्वतःच्या इच्छेने बदलू शकणार नाहीत. यामध्ये मायक्रोफोन, टच-सेंसिटिव्ह हॅप्टिक्स, रिॲक्टिव्ह लाईटिंग, टाईप-सी चार्जिंग आणि दिवसभर टिकणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.
सध्या हे डिव्हाईस वापरण्यासाठी आयफोनची गरज भासेल. बाय-डिफॉल्ट हे एआय पेंडंट ३० दिवसांपर्यंतचा संवाद लक्षात ठेवते. तर, मासिक सबस्क्रिप्शन घेतल्यास ते तुमच्या गप्पा कायमच्या लक्षात ठेवू शकते. या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत सुमारे ९५० रुपये आहे. एकीकडे हे डिव्हाईस एकटेपणा दूर करेल असा दावा कंपनी करत असली, तरी सोशल मीडियावर यावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक यूजर्सनी याला ‘डिस्टोपियन’ (एक काल्पनिक भयानक जग) म्हटले असून, याची तुलना प्रसिद्ध वेब सीरिज ‘ब्लॅक मिरर’शी केली आहे.