AI Market | दशकाच्या अखेरीस एआय बाजारपेठ १.८ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक?

AI Market |
AI Market | दशकाच्या अखेरीस एआय बाजारपेठ १.८ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक?
Published on
Updated on

लंडन : गेल्या काही वर्षांत एआय हे केवळ मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहिले नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आर्थिक निर्णय असोत, आरोग्य तपासणी असो किंवा घरी जाण्यासाठी योग्य रस्ता निवडणे असो, एआय प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका चोख बजावत आहे. विविध उद्योग अहवालानुसार, या दशकाच्या अखेरीस जागतिक एआय बाजारपेठ १.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. हा केवळ आर्थिक विकास नाही, तर बुद्धिमान तंत्रज्ञान आता मानवी समाजाचा मुख्य कणा बनत असल्याचा संकेत आहे.

आता एआयचे पुढील पाऊल आपल्या घरांमध्ये पडले आहे. हे केवळ एक तंत्रज्ञान राहिलेले नसून, लोकांचे आरोग्य आणि उत्तम जीवनशैली केंद्रस्थानी ठेवून विकसित केलेली एक संपूर्ण ‘इकोसिस्टम’ बनत आहे. अनेक वर्षांपासून आपण आरोग्याशी संबंधित समस्यांवर तेव्हाच लक्ष द्यायचो जेव्हा त्या समोर यायच्या. म्हणजेच, ॲलर्जी वाढल्यावर दूषित हवेची चिंता करणे किंवा आजारी पडल्यावर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे पाहणे. पण, आता ही 'समस्या आल्यावर उपाय शोधण्याची' विचारसरणी बदलत आहे.

एआय आणि ऑटोमेशनमुळे आपली घरे आता ‘स्मार्ट वातावरणात’ बदलत आहेत, जी आजूबाजूच्या परिसराला समजून घेऊ शकतात, संभाव्य समस्यांचा आधीच अंदाज लावू शकतात आणि वेळेत आवश्यक पावले उचलू शकतात. यामुळेच स्मार्ट होम तंत्रज्ञान वेगाने लोकप्रिय होत आहे. २०२४ मध्ये सुमारे १२८ अब्ज अमेरिकन डॉलर्स असलेली जागतिक स्मार्ट होम बाजारपेठ २०३० पर्यंत ५३७ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. विशेषतः कोव्हिड-१९ (COVID-19) महामारीनंतर लोकांनी उत्तम आरोग्य आणि मजबूत प्रतिकारशक्तीला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे घरातील हवा स्वच्छ ठेवणे ही आता गरज बनली आहे.

एआय आधारित एअर प्युरिफिकेशन सिस्टीम हवेतील धुलीकण, आर्द्रता आणि ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांवर सतत लक्ष ठेवतात. खोलीत कोणी नसल्यास हवेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता ही उपकरणे विजेची बचतही करतात. पाण्यातील टीडीएस तपासणे, फिल्टरची स्थिती तपासणे आणि स्थानिक पाण्याच्या गुणवत्तेनुसार सर्व्हिसिंगची गरज कधी पडेल, याचा अंदाज ही एआय उपकरणे आधीच वर्तवतात. यामुळे ग्राहकांना विनासायास शुद्ध पाणी मिळते. स्मार्ट किचन आता लोकांच्या खाण्याच्या सवयींनुसार उत्तम पर्याय सुचवू लागले आहेत. स्मार्ट चिमणी व्हॉईस कमांड (आवाज), मॉनिटर कंट्रोल आणि मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या सेटिंग्ज बदलू शकतात.

logo
Pudhari News
pudhari.news