

स्टॉकहोम : वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर गेल्या दशकापासून होत असला, तरी स्तनाच्या कर्करोगाच्या निदानाबाबत एक अतिशय दिलासादायक माहिती समोर आली आहे. स्वीडनमध्ये झालेल्या जगातील पहिल्याच अशा प्रकारच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे सिद्ध झाले आहे की, ‘एआय’च्या मदतीने केल्या जाणाऱ्या मॅमोग््रााफीमुळे कर्करोगाचे निदान अचूक होतेच; पण रुग्णांच्या जगण्याची शक्यताही लक्षणीय वाढते.
प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, एआयआधारित मॅमोग््रााफी स्क्रीनमुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होतो आणि तपासणीची अचूकता वाढते. यापूर्वीचे अभ्यास हे जुन्या माहितीवर आधारित होते; मात्र हे संशोधन थेट रुग्णांच्या प्रत्यक्ष निदानावर आधारित असल्याने याला ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले जात आहे. नियमित मॅमोग््रााफी करूनही काही वेळा कर्करोगाचे निदान होत नाही. याला वैद्यकीय भाषेत ‘इंटरव्हल कॅन्सर’ म्हणतात. हे कर्करोग अत्यंत आक्रमक असतात आणि दोन तपासण्यांच्या मधल्या काळात वेगाने पसरतात.
हे कॅन्सर सहसा स्तनाच्या पेशींच्या घनतेमुळे किंवा सामान्य ऊतींसारखे दिसत असल्याने मॅमोग््रााफीमध्ये निसटतात. या संशोधनानुसार, जर आपण हे ‘इंटरव्हल कॅन्सर’ सुरुवातीच्या टप्प्यावर शोधू शकलो, तर मृत्यू दरात मोठी घट होऊ शकते. एआय तंत्रज्ञान अशा सूक्ष्म गाठी ओळखण्यात अधिक सक्षम असल्याचे दिसून आले आहे. लुंड युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ संशोधक डॉ. क्रिस्टीना लाँग यांनी सांगितले की, ‘जर आपल्याला स्क्रीनिंगची कार्यक्षमता सुधारायची असेल, तर ‘इंटरव्हल कॅन्सर’चे प्रमाण कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. ‘एआय’मुळे जर हे प्रमाण कमी झाले, तर रुग्णांच्या उपचारांवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.’