

लंडन : एखाद्या व्यक्तीने एकही शब्द न बोलता आपल्या भावना आणि विचार स्पष्टपणे मांडले, तर? हे एखाद्या चित्रपटातील द़ृश्यासारखे वाटत असले, तरी विज्ञानाच्या जगात आता हे वास्तव बनले आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि बेइहांग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे एक असा ’एआय इंटेलिजेंट थ्रोट’ (कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त गळा) विकसित केला आहे, जो अर्धांगवायू मुळे बोलण्याची शक्ती गमावलेल्या लाखो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.
या उपकरणाला Revoice असे नाव देण्यात आले आहे. हा गळ्यात घालण्याजोगा एक छोटासा ’नेकब्रँड’ असून तो रुग्णाच्या ओठांच्या हालचाली आणि गळ्यातील सूक्ष्म कंपने ओळखून त्यांचे शब्दांत रूपांतर करतो. हा विशेषतः ’ Dysarthria’ (डायसार्थ्रिया) असलेल्या रुग्णांसाठी बनवला आहे. या आजारात रुग्णाच्या मेंदूला काय बोलायचे आहे हे माहित असते, परंतु स्नायूंच्या कमकुवतपणामुळे त्यांना शब्द उच्चारता येत नाहीत. साधारणपणे, अशा गंभीर समस्यांवर उपचार करण्यासाठी मेंदूमध्ये चिप किंवा इम्प्लांट बसवावे लागते, ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते. मात्र, ’ Revoice’ हे पूर्णपणे ’नॉन-इनवेसिव्ह’ आहे. म्हणजे हा एक मऊ बँड असून तो गळ्याच्या बाहेरील भागावर एखाद्या दागिन्याप्रमाणे (चोकर) सहज परिधान करता येतो. यात कोणतीही चिरफाड करण्याची गरज नाही.
या बँडमधील सेन्सर त्वचेतील 0.1 टक्के इतका किरकोळ बदलही अचूकपणे टिपतात. रुग्ण जेव्हा आवाज न काढता केवळ ओठ किंवा गळा हलवून काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे उपकरण गळ्यातील कंपने आणि ’कॅरोटिड आर्टरी’ची पल्स रेकॉर्ड करते. हे रेकॉर्ड केलेले डेटा दोन एआय सिस्टिम्सकडे पाठवले जाते. पहिला भाग तुटक शब्दांना जोडून वाक्य तयार करतो, तर दुसरा भाग रुग्णाच्या भावना ओळखून त्याला नैसर्गिक आवाज देतो. ही सर्व प्रक्रिया दर 100 मिलीसेकंदात पूर्ण होते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना तो अत्यंत नैसर्गिक वाटतो. पाच स्ट्रोक रुग्णांवर या उपकरणाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत शब्द ओळखण्यात 95.8 टक्के आणि पूर्ण वाक्य ओळखण्यात 97.1 टक्के इतकी जबरदस्त अचूकता दिसून आली आहे. या उपकरणाची बॅटरी दिवसभर चालते आणि ते वापरण्यास अत्यंत आरामदायी आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान पार्किन्सन आणि मोटर न्यूरॉन आजार असलेल्या रुग्णांसाठीही जीवनदायी ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.