AI Virus | ‘एआय’ने प्रयोगशाळेत पहिल्यांदाच बनवला नवा व्हायरस! मानवाला धोका की वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान?

वैज्ञानिक चक्रावले
AI Virus |
AI Virus | ‘एआय’ने प्रयोगशाळेत पहिल्यांदाच बनवला नवा व्हायरस! मानवाला धोका की वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ मजकूर लिहिणे, कोडिंग करणे किंवा चित्रे बनवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘एआय’ने आता विज्ञानाच्या जगात एक असे पाऊल टाकले आहे, ज्याने संपूर्ण वैज्ञानिक विश्वाला अचंबित केले आहे. अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांच्या मदतीने ‘एआय’ने प्रयोगशाळेत अगदी नवीन ‘व्हायरस’ तयार केला आहे.

वैज्ञानिक इतिहासात पहिल्यांदाच ‘एआय’ने संपूर्ण ‘व्हायरल जीनोम’ स्वतः डिझाईन केला असून त्याने प्रयोगशाळेत यशस्वीपणे कामही केले आहे. हा व्हायरस माणसे, वनस्पती किंवा प्राण्यांना कोणताही त्रास किंवा नुकसान पोहोचवत नाही. हे व्हायरस केवळ जीवाणूंना संक्रमित करतात. या संशोधनासाठी संशोधकांनी ‘Evo 1’ आणि ‘Evo 2’ नावाच्या ‘जीनोम लँग्वेज मॉडेल’चा वापर केला. ज्याप्रमाणे ChatGPT इंटरनेटवरील पुस्तके आणि माहिती वाचून लिहिण्यास शिकतो, तसेच या मॉडेल्सनी मानव, वनस्पती, बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या डीएनए सीक्वेन्सच्या पॅटर्नचा सखोल अभ्यास केला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ‘एआय’ ने व्हायरसचे अनेक संभाव्य जेनेटिक कोड तयार केले. वैज्ञानिकांनी यातील ३०० सर्वात अचूक डिझाईन्स निवडल्या आणि कृत्रिम ‘डीएनए’ तयार करून तो E. coli बॅक्टेरियामध्ये टाकला. या प्रयोगातून १६ असे व्हायरस तयार झाले जे बॅक्टेरियाच्या आत जिवंत राहिले आणि त्यांनी स्वतःची संख्या वाढवण्यात यश मिळवले.

वैज्ञानिकांच्या मते, भविष्यात आजारांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये ही तांत्रिक क्रांती ठरू शकते: सुपरबग्सवर प्रभावी उपचार (Phage Therapy): ज्या धोकादायक बॅक्टेरियांवर अँटिबायोटिक (प्रतिजैविके) औषधांचा प्रभाव पडत नाही (Superbugs), अशा बॅक्टेरियांना मारण्यासाठी या एआय-निर्मित व्हायरसचा वापर केला जाऊ शकतो. लाखो वर्षांचा प्रवास काही क्षणांत: AI ने व्हायरसच्या आत अशी जनुकीय वैशिष्‍ट्ये तयार केली आहेत, जी निसर्गामध्ये नैसर्गिकरीत्या विकसित होण्यासाठी कदाचित लाखो वर्षे लागली असती. जरी हा प्रयोग पूर्ण सुरक्षेसह उच्च दर्जाच्या बायो-लॅबमध्ये करण्यात आला असला, तरी यामुळे ‘जैविक सुरक्षेबाबत’ (Bio-security) नवीन चर्चा सुरू झाली आहे. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, हे तंत्रज्ञान सध्या मानवाला नुकसान पोहोचवणारे व्हायरस किंवा गुंतागुंतीच्या पेशी बनवण्याच्या स्थितीत नाही. तरीही, सायबर सुरक्षेप्रमाणेच आता ‘एआय’च्या ‘बायो-रिसर्च’मधील वापराबाबत कडक कायदे व नियम बनवण्याची मागणी जगभरातून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news