‘एआय’मुळे मानवाकृती रोबोंना मिळाले नैसर्गिक चालण्याचे कौशल्य

AI humanoid robots
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील एका रोबोटिक्स कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आपल्या ह्युमनॉइड म्हणजेच मानवाकृती रोबोंना अधिक नैसर्गिक दिसणारी चाल दिली आहे. कंपनीच्या मते, हा केवळ सुरुवातीचा टप्पा आहे. कंपनी ‘फिगर’ने विकसित केलेला ‘फिगर 02’ नावाचा रोबो एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये मानवी चालीनुसार मार्गक्रमण करताना दिसतो. हे कौशल्य रोबोटला भौतिक जगात सहजतेने हालचाल करण्यास मदत करेल, असे कंपनीने सांगितले आहे.

‘हे प्राथमिक परिणाम अत्यंत रोमांचक आहेत, पण आम्हाला वाटते की आमच्या तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेची ही केवळ झलक आहे,’ असे कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले आहे. ‘आम्ही रोबोला प्रत्येक मानवी परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी सातत्याने काम करत राहू.’ आजवर रोबोटस्ना धावणे, बॅकफ्लिप करणे, ब—ेकडान्स करणे आणि बुद्धिबळात माणसांना हरवणे जमले आहे. मात्र, सरळ चालणे, वस्तू घट्ट पकडणे, बूटाच्या लेस बांधणे आणि सामाजिक परिस्थितींमध्ये वागणे यासारख्या माणसांसाठी सोप्या वाटणार्‍या गोष्टी रोबोटस्साठी मोठे आव्हान ठरल्या आहेत. याला ‘मोरावेच पराडॉक्स’ म्हणतात. संगणक मोठ्या प्रमाणावर संख्यात्मक गणना आणि डेटा प्रक्रिया करण्यात तरबेज असतात, पण त्यांच्याकडे कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीमधून मिळालेला मानवी अनुभव नसतो. त्यामुळे अनेक रोबोची हालचाल अप्राकृतिक दिसते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘फिगर’च्या अभियंत्यांनी ‘रिइनफोर्समेंट लर्निंग’ या तंत्राचा वापर केला. त्यांनी हजारो आभासी रोबोंना विविध प्रकारच्या जमिनीच्या परिस्थितीत चालण्याचे प्रशिक्षण दिले. चांगल्या हालचालींसाठी या रोबोंना प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे त्यांची चाल अधिक नैसर्गिक बनली. हे सुधारित मॉडेल प्रत्यक्ष ‘फिगर 02’ रोबोमध्ये अपलोड करण्यात आले. परिणामी, हा रोबो मानवी पद्धतीने चालू शकतो, जसे की टाचा जमिनीला टेकवणे, पायाच्या बोटांवरून पुढे जाणे आणि हातांची समन्वय साधून हालचाल करणे.‘फिगर’ कंपनीचे उद्दिष्ट हे रोबोंना औद्योगिक क्षेत्रात वापरण्याचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news