

अबुधाबी : सध्याचा जमाना निर्विवादपणे ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. ‘एआय’चा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जात आहेत. काही वेळा तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवालाही मात देत असताना दिसून येते. आता संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑटोनॉमस रेसिंग लीगमध्ये ‘एआय’ संचालित ड्रोनने मानवी पायलटला पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या ऑटोनॉमस रेसिंग लीगमध्ये चार वेगवेगळ्या रेसिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन शर्यती ‘मावलॅब’ (Mavlab) च्या ‘एआय’ ड्रोनने जिंकल्या, तर एक शर्यत व्हिएतनामच्या ‘एआय’ टीमने जिंकली. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, मावलॅबच्या ‘एआय’ ड्रोनने एका व्यावसायिक मानवी पायलटलाही थेट लढतीत (वन टू वन रेस) पराभूत केले. या ड्रोनने 170 मीटरचे दोन लॅप्स केवळ 17 सेकंदात पूर्ण करून उपस्थितांना थक्क केले. ड्रोनचा हा अविश्वसनीय वेग पाहून सर्वजण अचंबित झाले.
स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व संघांनी त्यांच्या ड्रोनमध्ये एक फ्रंट-फेसिंग कॅमेरा, एक मोशन सेन्सर आणि ‘एनविडिया’चे कॉम्प्युटिंग युनिट वापरले होते. हे ड्रोन रिअल-टाईममध्ये सर्व निर्णय स्वतःच घेत होते. म्हणजेच, उड्डाण करताना मार्गाची ओळख, वेग आणि कुठे वळायचे याचे निर्णय ते स्वतःच करत होते. त्यांना बाहेरून कोणीही नियंत्रित करत नव्हते. या शर्यतीत ‘एआय’ने मानवाला हरवले असले तरी, तज्ज्ञांच्या मते, ज्या सुरक्षिततेने आणि वेगाने ‘एआय’ ड्रोन्सनी उड्डाण केले, ते भविष्यातील ड्रोन-आधारित सेवांसाठी नवीन मार्ग खुले करणारे आहे. या यशामुळे वस्तूंची जलद आणि सुरक्षित पोहोच, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्याची शक्यता वाढली आहे.