

मेक्सिको सिटी : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून मेक्सिकोच्या नऊ सरकारी संस्थांवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला आहे. डिसेंबर 2025 ते फेब—ुवारी 2026 या अडीच महिन्यांच्या कालावधीत हा हल्ला झाला असून, यामुळे कोट्यवधी नागरिकांचा अत्यंत संवेदनशील डेटा चोरीला गेला आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या घटनेला जगासाठी धोक्याची घंटा म्हटले आहे.
‘गॅम्बिट सिक्युरिटी’ या सायबर सुरक्षा कंपनीच्या संशोधकांनी या हल्ल्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या अहवालानुसार, हॅकर्सच्या एका छोट्या गटाने Anthropic चे Claude Code आणि OpenAI चे GPT-4.1 यांसारख्या प्रगत एआय टूल्सचा वापर करून फेडरल आणि स्टेट सरकारी संस्थांच्या सुरक्षा यंत्रणा भेदल्या.
चोरीला गेलेल्या माहितीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: 19.5 कोटी : नागरिकांची ओळखपत्रे आणि सविस्तर कर रेकॉर्डस्. 1.55 कोटी : वाहनांची नोंदणी (परवाना प्लेटस्, मालकांची नावे आणि पत्ते). 2.95 कोटी : नागरी नोंदी (जन्म, मृत्यू, विवाह इ.). 58 लाख: मालमत्ता धारकांचे आणि मालमत्तेचे रेकॉर्डस्. गॅम्बिट सिक्युरिटीचे संचालक एयाल सेला यांनी सांगितले की, हॅकर्सनी चोरी केलेल्या फायलींमधून महत्त्वाची माहिती निवडण्यासाठी 1,000 हून अधिक ‘प्रॉम्प्टस्’ (‘एआय’ला दिलेल्या सूचना) वापरले. या प्रक्रियेत 5,000 हून अधिक कमांडस् कार्यान्वित करण्यात आल्या. ‘हा हल्ला दर्शवतो की, ‘एआय’मुळे गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. आता एक छोटा गट देखील एखाद्या मोठ्या टीमप्रमाणे अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला करू शकतो,’ असे सेला यांनी अहवालात नमूद केले.
या मोहिमेत सुमारे 75 टक्के रिमोट हॅकिंग क्रिया ‘क्लाऊड’ या एआय मॉडेलद्वारे करण्यात आल्या. मात्र, हे काम हॅकर्ससाठी सोपे नव्हते. सेला यांच्या मते, प्रोग्रॅमिंगमधील सुरक्षा नियमांमुळे ‘क्लाऊड’ ने अनेकदा हॅकर्सच्या विनंत्या नाकारल्या. ‘हल्ला सुरू असताना ‘क्लाऊड’ ने अनेक कामांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, अधिकृत पुरावे मागितले आणि विशिष्ट हॅकिंग टूल्स तयार करण्यास नकार दिला,’ असेही अहवालात म्हटले आहे. या घटनेमुळे सरकारी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आता केवळ पारंपरिक सुरक्षा पुरेशी नसून, ‘एआय’द्वारे होणार्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रगत यंत्रणेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.