Hidden Heart Disease Warning Signal | एआयने शोधला हार्टचा ‘लपलेला’ धोक्याचा सिग्नल

हृदयविकारामुळे होणारा अचानक मृत्यू आता आधीच ओळखता येणार!
Hidden Heart Disease Warning Signal |
Hidden Heart Disease Warning Signal | एआयने शोधला हार्टचा ‘लपलेला’ धोक्याचा सिग्नल
Published on: 
Updated on: 

न्‍यूयॉर्क : वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारे एक अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने सामान्य ईसीजी चाचणीतील एक असा सूक्ष्म सिग्नल शोधून काढला आहे, जो भविष्यात होणाऱ्या अचानक हृदयविकाराच्या मृत्यूचा (सडन कार्डियाक डेथ) धोका आधीच ओळखू शकतो. या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांच्या नजरेतून निसटणारे हजारो संभाव्य धोके वेळेत ओळखून अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे.

हृदयाची विद्युत प्रणाली अचानक निकामी झाल्यामुळे हृदय रक्त पंप करणे थांबवते, याला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ म्हणतात. हा त्रास केवळ वयोवृद्धांनाच नाही, तर वरकरणी निरोगी दिसणाऱ्या तरुण खेळाडूंनाही होऊ शकतो. रुग्णालयाबाहेर असा झटका आल्यास सुमारे ९० टक्के रुग्णांचा काही मिनिटांतच मृत्यू होतो. आतापर्यंत हृदय किती प्रमाणात रक्त पंप करते यावर आधारित पारंपरिक चाचण्यांद्वारे धोका ओळखला जात असे; परंतु त्यातून अनेक रुग्ण निसटत होते. यावर मात करण्यासाठी संशोधक झियाद ओबरमेयर आणि त्यांच्या टीमने स्वीडनमधील ४ लाख ४० हजारांहून अधिक ईसीजी अहवालांवर एआय प्रणालीला प्रशिक्षण दिले आणि अमेरिका व तैवानमधील रुग्णांच्या डेटावर त्याची यशस्वी चाचणी घेतली.

प्रसिद्ध ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, पारंपरिक चाचण्यांपेक्षा एआय प्रणाली अधिक अचूकपणे अतिजोखमीच्या रुग्णांना ओळखू शकते. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही नवीन किंवा महागड्या मशिनची गरज नसून रुग्णालयांमध्ये नियमितपणे काढल्या जाणाऱ्या सामान्य ईसीजी प्रतिमांचाच वापर करता येणार आहे. सध्या स्वीडन, तैवान आणि अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या रुग्णांच्या ईसीजीमध्ये एआयला धोक्याचे संकेत दिसतील, त्यांना डॉक्टरांकडून सतत लक्ष ठेवण्यासाठी विशेष उपकरण किंवा आवश्यकतेनुसार ‘इम्प्लांटेड डिफिब्रिलेटर’ बसवण्याचा सल्ला दिला जाईल. एआयने शोधलेले हे सूक्ष्म संकेत वैद्यकीय विज्ञानाला मानवी हृदयाची कार्यपद्धती अधिक सखोलपणे समजून घेण्यास आणि अचानक होणारे मृत्यू टाळण्यास मोठी मदत करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.