

बीजिंग : जगभरात गंभीर आजारांचा धोका सातत्याने वाढत असतानाच वैद्यकीय क्षेत्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता केवळ तुमची जीभ पाहून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तुम्हाला असलेल्या गंभीर आजारांची ओळख पटवू शकणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एआयच्या मदतीने मधुमेहापासून ते पोटाच्या कर्करोगापर्यंतच्या सुरुवातीच्या लक्षणांचा अचूक शोध घेणे आता सोपे होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, आपले शरीर अंतर्गत बिघाडाचे संकेत स्वतःहून देत असते. डोळे, त्वचा किंवा लघवीमध्ये होणारे छोटे बदल वेळीच ओळखल्यास मोठ्या समस्या टाळता येतात. मात्र, अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. जुन्या काळातील वैद्य किंवा डॉक्टर केवळ रुग्णाची जीभ पाहून रोगाचे निदान करत असत. यावरून शरीरातील संसर्ग, जीवनसत्त्वांची कमतरता, यकृताच्या समस्या किंवा शरीरातील विषारी घटक वाढल्याचे समजायचे.
आता शास्त्रज्ञांच्या एका पथकाने या जुन्या निदानाच्या पद्धतीमध्ये ‘एआय’ची जोड दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे आजारांची ओळख पटवणे अधिक अचूक आणि सोपे झाले असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. पोटाचा कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांची सुरुवातीची लक्षणे जिभेच्या रंगात आणि पोतात बदल घडवून आणतात, जी एआय अचूकपणे टिपू शकते. मानवी डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म बदल एआय अल्गोरिदम ओळखू शकतात.
रुग्णालयात जाण्यापूर्वी किंवा महागड्या चाचण्या करण्यापूर्वी हे तंत्रज्ञान प्राथमिक माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ‘चायनीज मेडिसिन जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालाने आरोग्य तज्ज्ञांना नवी उमेद दिली आहे. 2024 मध्ये ‘टेक्नॉलॉजीज जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, एआय प्रोग््राामने केवळ रुग्णांच्या जिभेचे फोटो पाहून 60 पैकी 58 मधुमेह आणि ॲनिमियाच्या रुग्णांचे अचूक निदान केले होते. हे प्रोग््रााम जिभेमधील अतिशय सूक्ष्म बदल शोधतात. आजारी रुग्णांच्या हजारो फोटोंच्या डेटाबेसचा वापर करून या प्रोग््रााम्सना प्रशिक्षित करण्यात आले आहे.