

अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची तथाकथित सर्जनशीलता किंवा कल्पकता ही कडक गणितीय मर्यादांच्या चौकटीत अडकलेली आहे, असा निष्कर्ष एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. ‘जर्नल ऑफ क्रिएटिव्ह बिहेविअर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, ‘एआय’ची कल्पकता ही केवळ हौशी आणि व्यावसायिक माणसांच्या मधल्या स्तरापर्यंतच पोहोचू शकते. याचा अर्थ असा की, ‘एआय’ कधीही अत्यंत प्रतिभावान मानवी कलाकारांना मागे टाकू शकणार नाही.
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियातील इंजिनिअरिंग इनोव्हेशनचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे लेखक डेव्हिड क्रॉपली यांनी ‘चॅटजीपीटी’सारख्या ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ द्वारे तयार केलेल्या साहित्याचे विश्लेषण केले. क्रॉपली यांच्या मते, ‘अनेक लोकांना वाटते की चॅटजीपीटी कथा, कविता किंवा चित्रे तयार करू शकते म्हणजे ते सर्जनशील आहे. परंतु, एखादी गोष्ट तयार करणे (Generating) आणि सर्जनशील असणे (Being Creative) यात मोठा फरक आहे. ‘त्यांनी पुढे स्पष्ट केले की, साधारणपणे 60 टक्के लोकांची कल्पनाशक्ती सरासरीपेक्षा कमी असते, त्यामुळे समाजातील एका मोठ्या गटाला ‘एआय’ खूप सर्जनशील वाटते.
मात्र, जे लोक खरोखरच उच्च दर्जाचे सर्जनशील आहेत, त्यांना या ‘एआय’मधील उणिवा लगेच लक्षात येतात. सर्जनशीलता हा ‘हुशार’ किंवा ‘आकर्षक’ या शब्दांसारखाच एक मानवी गुणधर्म आहे, ज्याचे मोजमाप करणे कठीण असते. ‘एआय’ केवळ मानवी सर्जनशीलतेची नक्कल करू शकते; पण सध्याच्या तांत्रिक रचनेनुसार ते तज्ज्ञ किंवा व्यावसायिक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. ई-कॉमर्स रणनीतीकार जॅक शॉ यांनी या अभ्यासाला दुजोरा देताना म्हटले की, ‘जर सर्जनशीलता म्हणजे एखाद्या विषयाची नवीन मांडणी करणे, नवीन सांस्कृतिक संकेत तयार करणे आणि अपयशाची जोखीम पत्करून घेतलेली जबाबदारी असेल, तर मानवच यात आघाडीवर राहील. ‘एआय’ मॉडेल्स फक्त उपलब्ध माहितीतील नमुन्यांचे संश्लेषण करतात. त्यांच्याकडे स्वतःचा हेतू, जगण्याचा अनुभव किंवा स्वतःची उद्दिष्टे नसतात.’
महत्त्वाचे निष्कर्ष: ‘एआय’ ची कल्पकता ही सरासरी मानवी स्तरावरच मर्यादित राहील. मानवी कलाकारांच्या व्यावसायिक कौशल्याला ‘एआय’ सध्या तरी धोका पोहोचवू शकणार नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे केवळ ‘पॅटर्न’ ओळखणे म्हणजे खरी सर्जनशीलता नाही.