

सॅन फ्रान्सिस्को : आतापर्यंत अनेकजण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे (एआय) केवळ नोकर्या हिरावून घेणारे संकट म्हणून पाहत आले आहेत. मात्र, ‘एआय’ क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अँथ्रोपिक’चे सीईओ डारियो अमोदेई यांनी मानवी आयुष्याबाबत एक अशी भविष्यवाणी केली आहे, ज्याने संपूर्ण जग थक्क झाले आहे. अमोदेई यांच्या मते, ‘एआय’मुळे माणसाचे सरासरी वय 150 वर्षांपर्यंत पोहोचू शकते.
डारियो अमोदेई यांनी ‘मशिन्स ऑफ लव्हिंग ग्रेस’ या आपल्या लेखात सविस्तर स्पष्ट केले आहे की, हा दावा केवळ कल्पनेवर आधारित नसून बायोफिजिक्समधील त्यांचा अभ्यास आणि अनुभवावर आधारित आहे. त्यांच्या मते, ‘एआय’मुळे वैद्यकीय क्षेत्रात पुढील 10 वर्षांत इतकी प्रगती होईल, जी करण्यासाठी मानवाला 100 वर्षे लागली असती. याला त्यांनी ‘द कॉम्प्रिस्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी’ असे नाव दिले आहे. कर्करोगावर वैयक्तिक उपचार : प्रत्येक व्यक्तीचा कर्करोग वेगळा असतो. ‘एआय’ रुग्णाच्या ‘डीएनए’नुसार असे औषध तयार करेल जे शरीराला ईजा न पोहोचवता केवळ कर्करोगाच्या पेशींना नष्ट करेल.
अल्झायमरचा खात्मा : मेंदूची गुंतागुंतीची रचना समजून घेण्यासाठी माणसाला अनेक शतके लागली असती; पण ‘एआय’ काही वर्षांतच ती डिकोड करून विस्मरणासारखे आजार इतिहासजमा करेल. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण : mRNA तंत्रज्ञान आणि ‘एआय’च्या संगमामुळे भविष्यातील कोणत्याही महामारीला रोखणे अधिक सोपे होईल. अमोदेई केवळ आरोग्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सामाजिक बदलांवरही भाष्य केले आहे : आर्थिक प्रगती : ‘एआय’च्या मदतीने विकसनशील देशांचा जीडीपी दरवर्षी 20 टक्के दराने वाढू शकतो. भूकबळीचा अंत: शेती आणि अन्नपुरवठा साखळी इतकी प्रगत होईल की, जगातून उपासमार संपू शकते.
पर्यावरण : हरित ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या तंत्रज्ञानात ‘एआय’ क्रांती घडवून आणेल. नोकर्यांच्या धोक्यावर बोलताना अमोदेई यांनी सकारात्मक द़ृष्टिकोन मांडला. त्यांच्या मते, ‘एआय’मुळे पारंपरिक नोकर्या कमी होतील; पण यामुळे माणसाला स्वतःच्या छंदासाठी आणि नात्यांसाठी जास्त वेळ मिळेल. अशा परिस्थितीत सरकारांना ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (यूबीआय) सारखे मॉडेल्स राबवावे लागतील, ज्यामुळे नोकरीशिवायही लोक सन्मानाने जगू शकतील.