AI Completes Accounting Work | ‘एआय’ने दहा मिनिटांत १०० टक्के अचूकतेने पूर्ण केले अकौंटिंगचे काम

AI Completes Accounting Work |
AI Completes Accounting Work | ‘एआय’ने दहा मिनिटांत १०० टक्के अचूकतेने पूर्ण केले अकौंटिंगचे काम
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ चॅट करण्यापुरते किंवा कंटेंट लिहिण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अचूक गणिताची गरज असलेल्या कामांमध्येही ते मानवाला मागे टाकत आहे. एआय रिक्रूटिंग कंपनी ‘मर्कोर’च्या एका नवीन अभ्यासातून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अभ्यासानुसार, अँथ्रॉपिकचा नवीन मॉडेल ‘क्लॉड ओपस ५’ अकौंटिंगची (हिशोबाची) कठीण कामे १०० टक्के अचूकतेने अवघ्या १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करत आहे.

या आश्चर्यकारक निकालांनी टेक दिग्गज एलन मस्क यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) हा रिपोर्ट शेअर करत लिहिले की, “सुपर इंटेलिजन्स, ज्याला पूर्वी एआय म्हटले जायचे, आता अकौंटिंग टेस्टमध्ये टॉप स्कोर करत आहे.” मर्कोरच्या या अभ्यासाचे शीर्षक ‘ह्युमन बेसलाईन्स फॉर बेंचमार्क : एआय नाव आऊटपरफॉर्म ज्युनिअर अकाऊंटंट्स’ (Human Baselines for Benchmark: AI Now Outperform Junior Accountants) असे आहे. या अभ्यासात अनेक एआय मॉडेल्सच्या कामगिरीची तुलना १२ अनुभवी अकौंटंट्ससोबत करण्यात आली. या अभ्यासात सहभागी झालेले मानव हे परवानाधारक सीपीएम (CPA - Certified Public Accountant) होते आणि त्यांच्याकडे सरासरी साडेपाच वर्षांचा अनुभव होता.

संशोधकांनी या अकौंटंट्सना प्रत्यक्ष कंपन्यांच्या फाईल्सवर आधारित चार महिन्यांच्या शेवटी केल्या जाणाऱ्या अकौंटिंगच्या वेगवेगळ्या आव्हानात्मक परिस्थिती पूर्ण करण्यास सांगितले. यामध्ये दस्तावेजांमधून आवश्यक माहिती शोधणे, महत्त्वाचे आकडे ओळखणे, अचूक गणित करणे आणि अंतिम निकाल टेबलच्या स्वरूपात मांडणे यासारख्या कामांचा समावेश होता. या अभ्यासात मानवी अकौंटंटची सरासरी अचूकता ३७ टक्के राहिली. वैयक्तिक पातळीवर ही अचूकता भिन्न होती. काही प्रयत्नांमध्ये ती ० टक्के होती, तर सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली. ही कामे पूर्ण करण्यासाठी मानवाला ३० ते १८० मिनिटांचा वेळ लागला. याउलट, क्लॉड ओपसने अभ्यासातील सर्व २० प्रयत्नांमध्ये १०० टक्के अचूकता नोंदवली. तसेच, हे मॉडेल प्रत्येक काम अवघ्या १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी ठरले.

मानवी अकौंटंटची जागा ‘एआय’ घेणार नाही!

मर्कोरने या निकालांच्या आधारे एआय पूर्णपणे मानवी अकौंटंट्सची जागा घेऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यापासून सावध केले आहे. संशोधकांच्या मते, या चाचणीत अशा कामांवर लक्ष केंद्रित केले गेले होते, ज्यात एआय मॉडेल्स विशेषतः उत्तम असतात, जसे की सूचनांचे तंतोतंत पालन करणे, मोठ्या प्रमाणातील माहितीमधून आवश्यक गोष्टी शोधणे आणि गुंतागुंतीच्या गणितांची काळजी घेणे; परंतु प्रत्यक्ष जगातील अकौंटिंगचे काम केवळ एवढ्यापुरते मर्यादित नसते. वास्तविक जीवनात एका अकौंटंटला ग्राहकांशी संवाद साधावा लागतो, प्रश्न विचारावे लागतात, सहकाऱ्यांसोबत काम करावे लागते आणि वेळेनुसार जमवलेल्या अनुभवाचा वापर करावा लागतो, ज्या गोष्टींचे या अभ्यासात परीक्षण केलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news