‘एआय’ चॅटबॉटस् आता बनले गुप्त संदेशवाहक

ही पद्धत ‘डिजिटल अद़ृश्य शाईसारखी’ काम करते
AI-chatbots-now-used-as-secret-messengers
‘एआय’ चॅटबॉटस् आता बनले गुप्त संदेशवाहकPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : संशोधकांनी चॅट जीपीटी आणि इतर एआय चॅटबॉटस्चा वापर करत अत्याधुनिक गुप्त संदेशवाहन प्रणाली विकसित केली आहे, ज्यामध्ये सामान्य संदेशांमध्ये लपवलेले गुप्त संकेत (ciphers) इतक्या कुशलतेने समाविष्ट केले जातात की, सायबर सुरक्षा प्रणालीसुद्धा ते ओळखू शकत नाहीत. या नव्या तंत्रज्ञानामुळे, पारंपरिक कूटलेखन (encryption) प्रणाली सहजपणे ओळखल्या किंवा अवरोधित केल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत सुरक्षित संवादासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

ही पद्धत ‘डिजिटल अद़ृश्य शाईसारखी’ काम करते म्हणजे खरा संदेश फक्त पासवर्ड किंवा खासगी ‘की’ असलेल्या व्यक्तीलाच दिसतो. या प्रणालीचे नाव आहे EmbedderLLM, जी एक अल्गोरिदम वापरून एआय जनरेट केलेल्या मजकुरात खास जागांमध्ये गुप्त संदेश गुंफते. अगदी एखाद्या खजिन्यासारखा मजकुरात लपवलेला असतो. मजकूर पूर्णपणे मानवी भाषेसारखा दिसतो आणि सध्याच्या कोणत्याही डिकोडिंग प्रणालीने तो उघड करता येत नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.

गुप्त संदेश प्राप्त करणार्‍याजवळ ‘डिक्रिप्शन अल्गोरिदम’ (खजिन्याचा नकाशा) असतो, जो त्या मजकुरातील लपवलेली अक्षरे आणि शब्द शोधून मूळ संदेश उघड करतो. हे संदेश कोणत्याही चॅट प्लॅटफॉर्मवर व्हॉटस्अ‍ॅप, गेमिंग चॅटस्, सोशल मीडियावर सामान्य मजकुरासारखेच पाठवता येतात. हा अभ्यास 11 एप्रिल रोजी arXiv प्रीप्रिंट डेटाबेसवर प्रसिद्ध करण्यात आला असून, अद्याप त्याचे पिअर-रिव्ह्यू झालेले नाही.

अभ्यासाचे सहलेखक आणि युनिव्हसिर्र्टी ऑफ ओस्लो (नॉर्वे) येथील नेटवर्क्स आणि डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम्सचे संशोधक मयंक रैकवार यांनी सांगितले, ‘हे तंत्रज्ञान तांत्रिकद़ृष्ट्या अतिशय उत्साहवर्धक आहे, परंतु त्याच्या वापराबाबत नैतिकतेचा विचार करणे अत्यावश्यक आहे. हे तंत्र जसे चांगल्या हेतूसाठी वापरले जाऊ शकते, तसेच त्याचा गैरवापर होण्याचाही धोका आहे.‘ब्लॉकचेन तज्ज्ञ यूमिन झिया यांनीही प्रतिक्रिया देताना नमूद केलं की, ‘LLMs चा वापर कूटलेखनासाठी करणे शक्य आहे, हे खूप काही निवडलेल्या कूटलेखनाच्या प्रकारावर अवलंबून असेल. सध्या उपलब्ध असलेल्या काही प्रकारांमध्ये हे पूर्णपणे शक्य आहे.‘ या नव्या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित संवाद, सायबर संरक्षण, आणि डिजिटल गोपनीयतेच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते, पण त्याचवेळी त्याचा गैरवापर टाळण्यासाठी कठोर नियम आणि नैतिक चौकटींचीही आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news