

न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) रूपाने फॉरेन्सिकतज्ज्ञांना आता खुनांच्या तपासात एक नवे हत्यार मिळाले आहे. अमेरिकेतील लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी विकसित केलेली एक अनोखी एआय पद्धत किड्यांच्या रासायनिक ठशांवरून मृत्यूचा कालावधी आणि घटनास्थळाबद्दल माहिती देऊ शकते.
खुनांच्या घटनांमध्ये मृतदेहावर सर्वात आधी पोहोचणारे ब्लोफ्लाय नावाचे किडे असतात. हे किडे मृतदेहावर अंडी घालतात आणि नंतर अळी, कोष व ‘कवच’ या अवस्थांमधून जातात. हे कवच अनेक वर्षे टिकतात आणि त्यात रासायनिक घटकांचे ठसे राहतात. संशोधक रबी मुसा आणि त्यांच्या टीमने या कवचांचा अभ्यास करून एक अशी पद्धत तयार केली आहे, ज्यात ‘फिल्ड डीसॉर्प्शन-मास स्पेक्ट्रोमेट्री’ या तंत्राद्वारे प्रत्येक किड्याच्या प्रजातीचा रासायनिक ठसा घेतला जातो.
नंतर एआय मॉडेल त्या ठशांचे विश्लेषण करून किड्याची जात फक्त 90 सेकंदांत ओळखते. या तंत्रामुळे तपास अधिक अचूक होऊ शकतो. उदाहरणार्थ शरीर कुठे आणि कधी मृत झाले, ते नंतर दुसरीकडे हलवले गेले का किंवा विषप्रयोग झाला होता का, याबाबतचे सगळे संकेत या कवचांमधील रासायनिक माहितीमधून मिळू शकतात. ब्रिटनमधील कील युनिव्हर्सिटीचे विश्लेषक, रसायनशास्त्रज्ञ फाल्को ड्रिजफाऊट म्हणतात, ‘ही पद्धत फॉरेन्सिक तपासात क्रांतिकारक ठरू शकते. कारण, मृतदेहाबरोबर ही कवचे नेहमी राहतात आणि त्यातून अनेक वर्षांनंतरही महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात.