

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही चॅटजीपीटी किंवा गुगल जेमिनीसारख्या एआय टूल्सचा वापर फक्त कविता लिहिणे, कोडिंग करणे किंवा सुंदर चित्रे बनवण्यासाठी केला असेल. परंतु, आता कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याही एक पाऊल पुढे गेली आहे. तंत्रज्ञानाच्या जगात आता अशा ‘एआय एजंटस्’ची एन्ट्री झाली आहे, जे केवळ संवाद साधत नाहीत, तर तुमची कामे स्वतःहून पूर्ण करतात. भारतात आतापर्यंत एआयच्या तंत्रज्ञानासमोर सर्वात मोठी अडचण पेमेंटची होती. एआय तुमच्यासाठी सर्वात स्वस्त फ्लाईट किंवा वस्तू शोधू शकत होते; मात्र पेमेंटसाठी मानवी पिनची (MPIN) गरज असल्यामुळे तिथे प्रक्रिया थांबायची. आता ‘पाईन लॅब्स’ने ही अडचण दूर केली आहे. कंपनीने अशी सिस्टीम तयार केली आहे, ज्याद्वारे एआय एजंट तुमच्या परवानगीने स्वतः वस्तू खरेदी करेल आणि तुमच्या बँक खात्यातून यूपीआय पेमेंटही करेल.
साधारण एआय चॅटबॉट फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात; परंतु ‘एआय एजंटस्’ हे एखादे काम सुरुवातीपासून ते थेट शेवटपर्यंत स्वतः पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही जर एआय एजंटला सर्वात स्वस्त बूट शोधायला सांगितले, तर ते वेगवेगळ्या वेबसाईटस्वर जाऊन किमतींची तुलना करेल, सर्वोत्कृष्ट डील निवडेल आणि तुमच्यासाठी पेमेंटही पूर्ण करेल. भारताच्या डिजिटल बाजारातील हा एक क्रांतिकारी बदल मानला जात आहे. ‘पाईन लॅब्स’ने ही प्रक्रिया शक्य करण्यासाठी ‘पाईन लॅब्स पेमेंट प्रोटोकॉल’ (P3P) तयार केला आहे. हे सिस्टीम यूपीआयच्या सध्याच्या ‘वन-टाईम मॅंडेट’ (OTM) आणि ‘रिझर्व्ह पे’ या संरचनेवर काम करते.
यामध्ये यूजरला फक्त सुरुवातीला एकदाच आपली पैशांची मर्यादा ठरवून यूपीआय पिन टाकावा लागतो. यानंतर एआय एजंटला ती ठरावीक रक्कम खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळते. एकदा परवानगी मिळाल्यावर एआय एजंट कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा पुन्हा पिन न मागता बॅकग्राऊंडमध्ये पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करतो. जेव्हा एआयला पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. एआय आपले सर्व पैसे तर उडवणार नाही ना? ही भीती संपवण्यासाठी पाइईन लॅब्सने ‘Grantex’ नावाचे एक डिजिटल ओळख आणि परमिशन लेयर बनवले आहे. हे लेयर एआय एजंटसाठी ‘लक्ष्मण रेषा’ म्हणून काम करेल. यूजरने जी मर्यादा ठरवून दिली आहे, त्यापेक्षा एक रुपयाही जास्त एआय खर्च करू शकणार नाही. तसेच, ते प्रत्येक पैशाचा हिशेबही ठेवेल. हे कोणतेही भविष्यातील तंत्रज्ञान नसून याचा वापर प्रत्यक्षात सुरू झाला आहे. ‘गुल्लक’ या सेव्हिंग्ज ॲपवर ही सिस्टीम लाईव्ह झाली आहे.
येत्या काळात या तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्स वेबसाईटस्चे रूप पूर्णपणे बदलणार आहे. ‘विजय सेल्स’चे मॅनेजिंग डायरेक्टर करण गुप्ता यांच्या मते, आता ग्राहकांना स्मार्टफोन किंवा फ्रिजवरील डिस्काऊंट पाहण्यासाठी वारंवार ॲप उघडण्याची गरज नाही. ग्राहक त्यांच्या पर्सनल एआय एजंटला कामाला लावू शकतात. वस्तू त्यांच्या बजेटमध्ये येताच एआय एजंट ती त्वरित खरेदी करेल. तंत्रज्ञान तयार झाले असले, तरी भारतात अद्याप यावर कायदेशीर नियम पूर्णपणे स्पष्ट नाहीत. ‘भारतीय रिझर्व्ह बँक’ (RBI) कडे सध्या असा कोणताही फ्रेमवर्क नाही, जो हे ठरवेल की, एआय एजंटस्नी यूपीआय सिस्टीमवर कसे काम केले पाहिजे. यूपीआय मॅंडेट सिस्टीम मूळतः आयपीओ (IPO) आणि नेटफ्लिक्ससारख्या सबस्क्रिप्शनच्या ऑटोमॅटिक पेमेंटसाठी बनवली गेली होती. अशा परिस्थितीत, एआयला शॉपिंगचे स्वातंत्र्य दिल्यामुळे ग्राहकांची सुरक्षा आणि जबाबदारीबाबत अनेक नवीन कायदेशीर प्रश्न निर्माण होत आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे अजून बाकी आहे.