

रबात : उत्तर आफ्रिकेतील नाईल खोऱ्याच्या बाहेर सापडलेली आजवरची सर्वात जुनी संरक्षक रचना शोधण्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना यश आले आहे. मोरोक्कोमध्ये सुमारे ४,००० वर्षे जुन्या या संरक्षक भिंतींचे अवशेष उत्खननात आढळले आहेत. या शोधामुळे उत्तर-पश्चिम भूमध्य आफ्रिकेतील ‘माघ्रेब’ (Maghreb) प्रदेशातील मानवी विकास आणि विशेषतः शेतीचा स्वीकार कसा झाला, याबद्दलच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे.
‘माघ्रेब’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘पश्चिम’ असा होतो. या प्रदेशात मोरोक्को, मॉरिटानिया, अल्जिरिया, ट्युनिशिया आणि लिबिया या देशांचा समावेश होतो. इटलीच्या ‘नॅशनल रिसर्च कौन्सिल’चे पुरातत्त्वशास्त्रज्ञ ज्युलिओ लुकारिनी यांनी सांगितले की, ‘शंभर वर्षांहून अधिक काळ भूमध्यसागरीय उत्तर-प्रागैतिहासिक इतिहासात माघ्रेब प्रदेशाला एक रिकामा किंवा दुर्लक्षित भाग मानले जात होते. परंतु, नवीन संशोधनावरून असे स्पष्ट होते की ही पोकळी केवळ या प्रदेशाबद्दलच्या वैज्ञानिक माहितीच्या अभावामुळे निर्माण झाली होती. उदाहरणार्थ, सुमारे ८,५०० वर्षांपूर्वी युरोपमधील शिकारी-संग्राहक भूमध्य समुद्र ओलांडून माघ्रेब प्रदेशात आले असावेत, हे अलीकडेच प्राचीन डीएनए संशोधनातून उघड झाले आहे.
लुकारिनी पुढे म्हणाले, ‘चार हजार वर्षांपूर्वी, जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीपलीकडील समाजात बदल घडत असतानाच, येथील स्थानिक समुदाय आपल्या परिसराचा कायापालट करत होते आणि या प्रदेशात पूर्वी कधीही न पाहिलेल्या स्तरावर संरक्षक रचना उभारणी करत होते. या दोन्ही किनाऱ्यांवरील (माघ्रेब आणि युरोप) घडामोडींचा एकमेकांशी कसा संबंध होता, हे आता कुठे आपल्या लक्षात येऊ लागले आहे.’ मोरोक्कोची राजधानी रबातच्या पूर्वेस सुमारे ८० किलोमीटर (५० मैल) अंतरावर असलेल्या ‘वेड बेत’ (Oued Beht) नदीच्या खोऱ्यात हे संशोधन झाले असून, लुकारिनी या संशोधनाचे प्रमुख लेखक आहेत. गेल्या वर्षी मोरोक्कोच्या उत्तर भागात जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ असणाऱ्या ‘रिफ’ पर्वतरांगांमधील ‘कछ कुच’ (Kach Kouch) येथे एका प्रागैतिहासिक गावाचे अवशेष सापडले होते. या नवीन संशोधनातही त्याच संशोधकांचा समावेश आहे.