African Lake Silver Mirror | आफ्रिकेतील तलाव बनला ‘चांदीचा आरसा’!

African Lake Silver Mirror
African Lake Silver Mirror | आफ्रिकेतील तलाव बनला ‘चांदीचा आरसा’!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एका अंतराळवीराने काढलेल्या अद्भुत फोटोमध्ये ‘सनग्लिंट’ नावाची एक दुर्मीळ घटना टिपली गेली आहे, ज्यामुळे आफ्रिकेच्या मध्यभागी उल्कापातामुळे तयार झालेला एक तलाव अक्षरशः एका मोठ्या चांदीच्या आरशात बदलल्याचा भास होत आहे.

लेक इरो, जो स्थानिक पातळीवर ‘लाक इरो’ म्हणून ओळखला जातो, हा चाड देशातील सुमारे 7 मैल (12 किलोमीटर) रुंद जलाशय आहे. हा तलाव मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या सीमेपासून सुमारे 60 मैल (100 कि.मी.) उत्तरेस आहे. हा तलाव आफ्रिकेच्या साहेल प्रदेशाच्या मध्यभागी आहे, जो सहारा वाळवंट आणि मध्य आफ्रिकेतील घनदाट जंगलांना वेगळे करणारा एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. इरो तलाव ‘बहर सलामत’ या सुमारे 125 मैल (200 कि.मी.) लांबीच्या जलमार्गाने अंशतः वेढलेला आहे.

‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, हा जलमार्ग विशेषतः इरोच्या दक्षिण किनार्‍याजवळून वाहताना अतिशय वळणदार आणि वेगवान आहे. या फोटोमध्ये तलाव आणि नदीचा मोठा भाग तेजस्वीपणे चमकत आहे. कारण, सूर्यप्रकाश त्यांच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून थेट परावर्तित झाल्याने त्यांना धातूसारखी चमक प्राप्त झाली आहे. आपण बारकाईने पाहिल्यास, पृष्ठभागाचे काही भाग इतरांपेक्षा अधिक पांढरे दिसतात. हे भाग बहुधा तलावावर तरंगणार्‍या ढगांचे प्रतिबिंब असावेत. या नैसर्गिक घटनेला ‘सनग्लिंट’ असे म्हणतात. जेव्हा निरीक्षक (या बाबतीत अंतराळवीर) आणि सूर्यप्रकाश परावर्तित करणारी वस्तू (तलाव) एका सरळ रेषेत येतात, तेव्हाच ही घटना घडते.

यामुळे हा परिणाम अंतराळातून सर्वोत्तम दिसतो. उपग्रहांची पाहण्याची दिशा निश्चित असते, याउलट अंतराळवीर आपला कोन बदलू शकत असल्याने त्यांच्यासाठी अशी द़ृश्ये टिपणे अधिक सोपे होते. अलीकडच्या वर्षांत, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांनी ग्रीक बेटांभोवती एक प्रचंड सनग्लिंट पाहिला होता, ज्यातून अनेक असामान्य सागरी घटना उघड झाल्या होत्या. तसेच, रशियन ज्वालामुखींच्या मध्ये वसलेल्या एका ज्वालामुखी तलावात ‘ढगांचा समुद्र’ तयार करणारा आणखी एक सनग्लिंट त्यांनी पाहिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news