African Elephants | आफ्रिकन हत्तीही करतात स्वतःवर नैसर्गिक औषधोपचार

आजारी पडल्यावर निवडक वनस्पतींचा घेतात आधार
African Elephants |
African Elephants | आफ्रिकन हत्तीही करतात स्वतःवर नैसर्गिक औषधोपचार
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : माणसांप्रमाणेच वन्य प्राणीही आजार किंवा शारीरिक त्रासातून मुक्त होण्यासाठी निसर्गातील औषधी घटकांचा वापर करत असल्याचे संशोधनातून वारंवार समोर आले आहे. आता या यादीत आफ्रिकन हत्तींचाही समावेश झाला आहे. काही आफ्रिकन हत्ती विशिष्ट वनस्पतींची पाने किंवा साल खाण्यासाठी लांबचा प्रवास करत असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही वनस्पतींचा वापर स्थानिक मानवी समुदाय पारंपरिक औषधांमध्येही करतात. वन्य प्राण्यांमधील अशा वर्तनाला शास्त्रज्ञ ‘झुओफार्माकोग्नोसी’ असे म्हणतात. म्हणजेच आजार, जखम किंवा परजीवींचा त्रास कमी करण्यासाठी प्राणी स्वतःहून विशिष्ट नैसर्गिक पदार्थांची निवड करतात. वनस्पतींची पाने, साल, मुळे किंवा राळ यांसोबतच काही प्राणी माती, कोळसा आणि कीटकांचाही अशा प्रकारे वापर करतात.

ठरावीक झाडापर्यंतच धाव

अभ्यासात काही हत्ती एखाद्या विशिष्ट झाडापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे अंतर कापत असल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान ते वाटेत उपलब्ध असलेल्या इतर वनस्पतींवर चारा न खाता थेट लक्ष्य असलेल्या झाडापर्यंत पोहोचत होते. तेथे पोहोचल्यानंतर पाने किंवा साल खाण्यावर त्यांचा भर होता. हत्तींचे हे वर्तन केवळ अन्नाच्या शोधाशी संबंधित नसून त्यांना विशिष्ट वनस्पतीची आवश्यकता असल्याचे संकेत यातून मिळतात. त्यामुळे हत्तींच्या नैसर्गिक औषधी ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ही निरीक्षणे महत्त्वाची ठरू शकतात. प्राण्यांचे ‘नैसर्गिक औषधालय’स्वतःवर उपचार करण्याच्या अशा वर्तनाची उदाहरणे यापूर्वीही अनेक प्राण्यांमध्ये आढळली आहेत. ओरांगउटान जखमांवर विशिष्ट वनस्पतींचा लेप करतात. चिंपांझी कडू चवीची, जंतुनाशक गुणधर्म असलेली पाने खातात.

इंडो-पॅसिफिक बॉटलनोज डॉल्फिन विशिष्ट प्रवाळांवर शरीर घासताना दिसले आहेत. काही पक्षी आपल्या घरट्यांमध्ये कीटकनाशक गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा वापर करतात. अशा वनस्पतींचा वापर अंतर्गत परजीवी, श्वसनविकार, बुरशीजन्य संसर्ग, जखमा आणि पचनाशी संबंधित समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जात असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. हत्तींसह विविध प्राण्यांच्या या वर्तनामुळे निसर्गातील औषधी घटकांविषयीची त्यांची सहज ज्ञानात्मक समज किती व्यापक आहे, याचा शोध घेण्याची नवी दिशा संशोधकांना मिळाली आहे. मानवी पारंपरिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती आणि वन्य प्राण्यांच्या स्व-औषधोपचारातील वनस्पती यांच्यातील साम्यही या संशोधनामुळे अधिक लक्षवेधी ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news