

वॉशिंग्टन : मैदानी क्षेत्रांच्या तुलनेत पर्वतांवर ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे जेव्हा जेव्हा मैदानी क्षेत्रातील कोणीही पर्वतरांगांमध्ये जाते तेव्हा त्यांना श्वासोच्छ्वासास त्रास होतो. या प्रक्रियेला ‘हायपॉक्सिया’ असे म्हटले जाते; मात्र पर्वतीय भागातच पिढ्यान्पिढ्या राहणार्या लोकांना असा त्रास होत नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या शरीराने अशा स्थितीत राहण्यासाठी स्वतःला अनुकूल बनवलेले आहे. मागील 10 हजार वर्षांपासून पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असणार्यांच्या शरीरात तेथील भौगोलिक स्थितीमध्ये हवामानानुसार बदल झाले आहेत.
अमेरिकेच्या केस वेस्टर्न विद्यापीठाच्या अँथ्राेपोलॉजिस्ट सिंथिया बील यांच्या निरीक्षणानुसार मागील 10 हजार वर्षांमध्ये पर्वतीय क्षेत्रांतील नागरिकांच्या शरीरात तेथील वातावरणाच्या अनुषंगाने बदल झाले आहेत, त्यांचे शहर आवश्यकतेनुसार विकसित झाले आहे. ही मंडळी ज्या उंचीवर वास्तव्यास असतात तिथे मैदानी क्षेत्रातील नागरिकांना डोकेदुखी, श्वसनास त्रास, कानांवर हवेचा दाब वाढल्याचे जाणवणे अशा अडचणी जाणवू लागतात, पण स्थानिकांमध्ये मात्र यातील एकही लक्षण दिसत नाही, कारण त्यांच्या शरीराने येथील वातावरण आत्मसात केलेले असते. सिंथिया यांच्या मते एकंदर निरीक्षणातून लक्षात येत असलेल्या मुद्द्यानुसार मनुष्य हा एकमेव असा सजीव आहे, जो विविध भौगोलिक स्थितींनुसार स्वत:च्या शरीरात नकळत बदल घडवून आणत असतो. तिबेटच्या नागरिकांच्या शरीरात असेच काही जनुकीय बदल झाले आहेत. जिथे कमी ऑक्सिजनपुरवठ्यातही त्यांच्या शरीरात काम करण्याची क्षमता विकसित झाली आहे. त्यांची श्वासोच्छ्वास यंत्रणा उत्तम काम करत असून, हृदयही त्यानुसारच कार्यक्षम ठरत आहे. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे.