

वॉशिंग्टन : प्रख्यात हॉलीवूड अभिनेत्री कँडेस कॅमेरॉन ब्युरेने हॉलीवूडमधील वजन कमी करण्याच्या नव्या ट्रेंडवर सडकून टीका केली आहे. एका मुलाखतीत तिने या ‘झिरो फिगर’च्या फॅडला ‘भीतीदायक’ संबोधले असून, यामुळे लोकांचा स्वतःच्या शरीराकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे हॉलीवूडमध्ये ‘झिरो फिगर’ विरोधात जागृती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
कँडेस म्हणाली, 80 आणि 90 च्या दशकात ‘केट मॉस’च्या काळात आम्ही मोठे झालो. त्यामुळे बारीक असणे हेच सुंदरतेचे लक्षण आहे, असे आमच्या मनावर बिंबवले गेले होते. आज पुन्हा तोच ट्रेंड पाहून जुन्या त्रासदायक आठवणी जाग्या होतात. माझ्या स्वतःच्या शरीराविषयीच्या कल्पना आजही पूर्णपणे योग्य नाहीत आणि हे खूप त्रासदायक आहे. तिने सध्याच्या तरुण पिढीच्या ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’च्या द़ृष्टिकोनाचे कौतुक केले.
ओझेम्पिकसारख्या औषधांच्या वाढत्या वापराबाबत बोलताना ती म्हणाली, लोक हे का करत आहेत, यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी आरोग्य आणि कुटुंबासोबत अधिक काळ घालवता येणे हे महत्त्वाचे आहे.आपल्या श्रद्धेचा आधार घेत कँडेसने सांगितले की, आपले वजन किंवा बाह्य रूप कसे आहे यावर परमेश्वराचे प्रेम अवलंबून नसते. तो अंतःकरणाचे सौंदर्य पाहतो आणि कोणत्याही परिस्थितीत हाच विचार मला खरी ताकद देतो.