अंटार्क्टिकामध्ये कोसळतो ‘रक्ताचा धबधबा’!

A waterfall of blood falls in Antarctica
अंटार्क्टिकामध्ये कोसळतो ‘रक्ताचा धबधबा’!Pudhari File Photo
Published on
Updated on

सिडनी : पृथ्वीच्या पाठीवर निसर्गाची अनेक थक्क करणारी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. त्यामध्येच अंटार्क्टिकामधील टेलर ग्लेशियर फॉलचा समावेश होतो. त्याला ‘ब्लड फॉल’ असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे रक्तासारख्या लाल पाण्याचा हा अनोखा धबधबा आहे. अंटार्क्टिकाच्या बोनी सरोवरात हा टेलर नावाच्या हिमनदीचा धबधबा पडतो. शंभर वर्षांपूर्वी या ब्लड फॉलचा शोध लागला. त्यावेळेपासून त्याबाबत संशोधकांमध्ये कुतुहल होते.

1911 मध्ये ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफिथ टेलर यांना टेलर ग्लेशियरचे अन्वेषण करीत असताना काहीतरी असामान्य असे समजले. त्यांना एक असा धबधबा सापडला, जो बर्फाळ, सफेद पार्श्वभूमीवर ठळकपणे दिसत होता. लालभडक रंगाचा हा धबधबा पाहून ते थक्कच झाले. सुरुवातीच्या संशोधनांमधून असा कयास करण्यात आला होता की, लाल शैवालामुळे या धबधब्याला असा रंग मिळाला असेल. मात्र, 2003 मध्ये अलास्का विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून असे दिसून आले की, हा पाण्याचा लाल रंग लोहयुक्त पाण्यापासून येतो, जे हिमनदीखाली लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्यावेळी हे पाणी पृष्ठभागावर येते आणि त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येतो, त्यावेळी ते ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेतून जाते. याच प्रक्रियेमुळे लोखंडाला गंज चढत असतो. या प्रक्रियेमुळे धबधब्याला असा लालभडक रंग मिळतो. या पाण्यात सूर्यप्रकाश, ऑक्सिजन नसले तरी ‘केमोसिंथेसिस’ नावाच्या प्रक्रियेने जीवाणूंंची वस्ती अस्तित्वात असते. अत्यंत थंड परिस्थितीतही तिथे असा धबधबा वाहतो हे विशेष! याठिकाणी अनेक वेळा तापमान उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. मात्र, तरीही हा धबधबा कसा वाहतो याचेही कुतुहल होते. 2003 मध्ये त्याचे उत्तर सापडले. समुद्राच्या पाण्यापेक्षा सुमारे दुप्पट क्षार किंवा मीठ असलेले हे पाणी आहे, तसेच त्याला हिमनदी गोठण्याच्या प्रक्रियेतून मिळणारी उष्णताही मिळते. यामुळे हा धबधबा वाहता राहतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news