

बीजिंग : जगाच्या पाठीवर काही थक्क करणार्या गोष्टी पाहायला मिळत असतात. त्यामध्येच चीनमधील एका अनोख्या कॉफी शॉपचा समावेश होतो. हे कॉफी शॉप चक्क एका उत्तुंग पर्वतकड्यावर अधांतरी लटकत आहे. अर्थातच ते सामान्य लोकांसाठी नसून हा पर्वतकडा चढणार्या धाडसी गिर्यारोहकांसाठी आहे. याठिकाणी बसून पर्वताचा पायथा जणु काही धूत असलेल्या समुद्राचे विहंगम द़ृश्यही पाहता येते.
याबाबतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की जणू काही उभी भिंतच असलेल्या या कड्यावर लोकांना बसण्यासाठी काही जागा बनवलेल्या आहेत. हेच ते कॉफी शॉप आहे जिथे बसून लोक कॉफी पित समुद्राला पाहू शकतात. इन्स्टाग्रामवर याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या कॉफी शॉपचे नाव ‘क्लिफ कॉफी’ असे आहे. त्याचे हे अनोखे लोकेशन पाहून लोक थक्क होतात. काही लोक या फळीवजा कठड्यांवर बसून कॉफी पित असतानाही यामध्ये दिसतात. हा पर्वत चीनच्या फुजियानमधील गुशी गावात आहे. त्याचा हा थक्क करणारा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की या शॉपचे नाव ‘रिस्की कॉफी’ असे ठेवायला हवे होते!