Scotland UFO | स्कॉटलंडमध्ये उतरली जणू ‘उडती तबकडी’!

पर्यटकांना आकर्षित करणारे अनोखे होमस्टे
Scotland UFO |
Scotland Flying Saucer | स्कॉटलंडमध्ये उतरली जणू ‘उडती तबकडी’!
Published on: 
Updated on: 

लंडन : ब्रिटनमधील स्कॉटलंड हे आपल्या निसर्गसौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु, इथे एक असे अनोखे होमस्टे आहे, जे एखाद्या ‘उडत्या तबकडी’सारखे (UFO) दिसते, हे तुम्हाला माहिती आहे का? स्कॉटलंडच्या निसर्गरम्य 'हायलँड्स' भागात समुद्रकिनारी हे घर उभारण्यात आले असून, ते हुबेहूब युएफओसारखे दिसते.

‘उडती तबकडी’ ऐकून हे घर खरोखरच हवेत उडते की काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, हे घर हवेत उडत नाही. तरीही आपल्या अत्यंत अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पर्यटकांमध्ये मुक्कामासाठी हे एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडते ठिकाण बनले आहे. स्कॉटलंडला भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांच्या विशलिस्टमध्ये (बकेट लिस्ट) या युएफओसारख्या दिसणाऱ्या होमस्टेमध्ये राहण्याचा समावेश असतो. यामुळेच दरवर्षी या होमस्टेतून कोट्यवधी रुपयांची कमाई होते. दरम्यान, आता हे अनोखे घर विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युएफओसारख्या दिसणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण घराची रचना २०१६ मध्ये एक प्रयोग म्हणून करण्यात आली होती. वास्तुशास्त्रज्ञ रॉड्रिक जेम्स आणि त्यांच्या पत्नी अमांडा मार्कहम यांनी ॲल्युमिनियम आणि ड्रॅगनफ्लायच्या (चतुर) पंखांसारख्या खिडक्यांचा वापर करून ‘एयरशिप ००२’ (Airship 002) तयार केले होते.

एयरशिपच्या आकाराचे हे अनोखे घर दिसायला अतिशय वेगळे आणि आकर्षक असून, मोठ्या संख्येने पर्यटकांना ते आपल्याकडे आकर्षित करते. हे अनोखे घर चार एकर परिसरात पसरलेल्या एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. या संपूर्ण परिसरात अशी एकूण तीन अनोखी होमस्टे तयार करण्यात आली असून, पर्यटकांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय आहेत. समुद्रकिनारी असल्यामुळे या युएफओसारख्या घरांतून सभोवतालचा निसर्गरम्य परिसर आणि दृश्य अत्यंत नयनरम्य दिसते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनमुळे हे होमस्टे पर्यटकांच्या पसंतीस उतरले असून, यातून दरवर्षी बंपर कमाई होते. या सर्व होमस्टेतून वर्षाला सुमारे १ लाख पाऊंड म्हणजेच जवळपास १.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. आता ही संपूर्ण मालमत्ता ७.५ लाख पाऊंड म्हणजेच सुमारे ९.५ कोटी रुपयांना विकण्याची तयारी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news