

गोथेंबर्ग/पसाडेना : स्वीडनच्या चालमर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि नासाच्या शास्त्रज्ञांनी शनी ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या टायटनवर एक मोठी आणि अनोखी रासायनिक प्रक्रिया शोधून काढली आहे. या शोधाने रसायनशास्त्राच्या जुन्या सिद्धांतांना आव्हान दिले आहे. टायटनचे तापमान अत्यंत कमी (जवळपास -180 अंश सेल्सिअस) असूनही, जे पदार्थ सामान्यतः एकमेकांत मिसळत नाहीत, ते एकत्र येऊन एका नवीन प्रकारचा स्फटिक (क्रिस्टल) बनवू शकतात, असे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
टायटनचे वातावरण नायट्रोजन आणि मिथेनच्या दाट थरांनी भरलेले आहे. येथील सरोवर आणि वाळूचे ढीग विचित्र नारंगी रंगाचे दिसतात, जे अब्जावधी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणासारखे आहे. शास्त्रज्ञांनी हायड्रोजन सायनाईड (Hydrogen Cyanide - HCN) नावाच्या एका रेणूवर लक्ष केंद्रित केले, जो टायटनच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि तो ध्रुवीय (Polar) असतो. त्यांनी अभ्यास केला की, हे HCN रेणू मिथेन आणि इथेनसारख्या अध्रुवीय (Non-Polar) घटकांसोबत कसे मिसळतात.
रसायनशास्त्राच्या जुन्या नियमांनुसार, तेल आणि पाण्याप्रमाणे, ध्रुवीय आणि अध्रुवीय पदार्थ सहसा एकत्र मिसळत नाहीत. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत प्रयोग केले आणि मोठ्या कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापर केला. यातून त्यांनी दाखवून दिले की, हायड्रोकार्बनचे रेणू (Non- Polar) HCN च्या स्फटिकांमध्ये प्रवेश करतात आणि अशा प्रकारे नवीन, अधिक स्थिर (Stronger) रचना तयार करतात. ‘पीएनएएस’ (PNAS) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधाने ‘समान पदार्थ एकमेकांमध्ये मिसळतात’ या नियमालाच चुकीचे ठरवले नाही, तर टायटनच्या जमिनीची रचना आणि तेथील विशिष्ट भूभागाच्या निर्मितीमध्येही या रेणूंच्या परस्परक्रियेचा सहभाग असू शकतो हे स्पष्ट केले आहे.
अतिशय कठोर आणि प्रतिकूल वातावरणातील रसायनशास्त्र समजून घेतल्याने, जीवाच्या उत्पत्तीबद्दल आपली विचारसरणी अधिक सखोल होते. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने चालमर्स युनिव्हर्सिटीशी संपर्क साधल्यानंतर हे संशोधन सुरू झाले. अत्यंत कमी तापमानावर HCN ला मिथेन आणि इथेनमध्ये मिसळल्यावर अनपेक्षित परिणाम मिळाल्याने नासाला त्यांची वैज्ञानिक व्याख्या हवी होती. नासाचे ‘ड्रॅगनफ्लाय’ मिशन 2024 मध्ये टायटनवर पोहोचेल आणि ही नवीन माहिती भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, पृथ्वीबाहेरच्या थंड अंतराळातही होणार्या या अद्वितीय रासायनिक क्रिया जीवनाच्या निर्मितीचा मार्ग उघडू शकतात. यामुळे ब्रह्मांडात जीवन कुठे आणि कसे सुरू होऊ शकते, याबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर पडेल.