

बीजिंग : स्वयंपाकघरात अन्न शिजवताना तुम्ही अनेकदा आचारी किंवा कुकला कढईत भाजी उडवताना पाहिले असेल. विशेषतः हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये शेफ अगदी सहजपणे कढईला हिसका देतात आणि भाज्या हवेत उडून पुन्हा कढईत पडतात. मात्र, चीनमधून व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असे करण्यासाठी कोणत्याही शेफची गरजच भासत नाहीये. इथे गॅस स्टोव्हवर ठेवलेली कढई आपोआप हलताना आणि फिरताना दिसत आहे. त्यातील हिरव्या पालेभाज्याही सतत वर-खाली उडत आहेत. पहिल्या नजरेत एखादा कुक समोर उभा राहून स्वयंपाक करत असल्यासारखे वाटते, पण व्हिडीओमध्ये आजूबाजूला कोणीही व्यक्ती दिसत नाही.
या अनोख्या किचनचा व्हिडीओ पाहण्यासाठी तेथे उपस्थित असलेले लोकही उत्सुक दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अनेक जण आपल्या मोबाईल फोनवरून हे दृश्य रेकॉर्ड करताना दिसत आहेत. कढईची हालचाल पाहून असे वाटते की स्वयंपाकाचे काम सोपे करण्यासाठी यंत्रांचा वापर कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक ऑटोमॅटिक कुकिंग आणि रोबोटिक तंत्रज्ञानाबाबत आपली मते मांडत आहेत. या व्हिडीओने पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला आहे की भविष्यात स्वयंपाकघरातील कामात किती मोठा बदल होणार आहे.
आतापर्यंत अन्न शिजवण्यासाठी भाजी चिरण्यापासून ते मसाले घालण्यापर्यंत आणि ती नीट शिजवण्यापर्यंत प्रत्येक कामात माणसाची गरज भासते. मात्र, ऑटोमॅटिक कुकिंग सिस्टीममुळे ही मेहनत कमी होऊ शकते. अशी यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली, तर रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनमधील काम करण्याची पद्धतही बदलू शकते. तथापि, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या यंत्राचे संपूर्ण तंत्रज्ञान आणि त्याच्या क्षमतेबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओबाबत लोक मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. काही युजर्सनी गंमतीने म्हटले आहे की आता कढईच शेफ बनली आहे!