

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळातील सर्वात दुर्मीळ द़ृश्यांपैकी एक शोधून काढल्याचा दावा केला आहे. एका दूरवरच्या तार्याभोवती दोन ग्रहांची एकमेकांशी जोरदार धडक झाली असून, शास्त्रज्ञांनी या घटनेचे पुरावे गोळा केले आहेत. ही घटना पृथ्वीपासून सुमारे 11,000 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘Gaia20 ehk’ नावाच्या सूर्यासारख्या तार्याभोवती घडली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, ही टक्कर अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या ‘महा-आघाताची’ आठवण करून देणारी आहे. यामुळे खगोलीय वस्तूंचा आकार कसा बदलतो, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांना एक दुर्मीळ संधी मिळाली आहे. हे संशोधन 11 मार्च रोजी ‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे खगोलशास्त्रातील संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक अनास्तासिओस झानिडाकिस म्हणाले की, ‘विविध दुर्बिणींनी हा आघात रिअल-टाईममध्ये टिपणे ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे.
इतिहासात अशा प्रकारच्या ग्रहांच्या टकरींच्या खूप कमी नोंदी आहेत आणि त्यापैकी कोणतीही पृथ्वी-चंद्राच्या निर्मितीशी इतकी साम्य दर्शवणारी नाही.’ तरुण तारा प्रणालींमध्ये ग्रहांची टक्कर होणे सामान्य मानले जाते. परंतु, ते कॅमेर्यात कैद करणे अत्यंत कठीण असते. जेव्हा ढिगारा तार्याच्या प्रकाशाचा काही भाग अडवतो, तेव्हाच दुर्बिणीद्वारे द़ृश्य आणि इन्फ्रारेड प्रकाशात त्याचे मोजमाप करता येते. नासाच्या ‘SPHEREx'’ मोहिमेसह इतर डेटाचा अभ्यास करताना झानिडाकिस यांना पहिला सुगावा लागला. 2016 मध्ये ‘Gaia20 ehk’ हा तारा अतिशय सामान्य आणि स्थिर दिसत होता. मात्र, पाच वर्षांनंतर अचानक या तार्याचा प्रकाश तीन वेळा कमी झाला आणि तिथली परिस्थिती पूर्णपणे बदलली.
झानिडाकिस यांच्या मते, 2021 च्या सुमारास या तार्याची स्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली. ‘आपल्या सूर्यासारखे तारे सहसा असे वागत नाहीत. त्यामुळे जेव्हा आम्ही हे पाहिले, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले की, नक्की तिथे काय चालले आहे?’ असे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला खगोलशास्त्रज्ञांना हा केवळ धुळीचा लोट आहे की, एखाद्या कृष्णविवराचा परिणाम आहे, हे समजत नव्हते. मात्र, जेव्हा त्यांनी इन्फ्रारेड स्पेक्ट्रमचा अभ्यास केला, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. तार्याचा द़ृश्य प्रकाश कमी होत असताना, त्याचे इन्फ्रारेड सिग्नल मात्र वाढत होते. याचा अर्थ असा की, तार्याचा प्रकाश अडवणारा पदार्थ अत्यंत उष्ण होता आणि तो उष्णतेमुळे चमकत होता. ही उष्णता दोन ग्रहांच्या भीषण टकरीमुळे निर्माण झाली असावी, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. या संशोधनामुळे भविष्यात आपल्या सूर्यमालेचा इतिहास समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे.