₹1 Crore Buffalo | एक कोटी रुपयांचा रेडा!

₹1 Crore Buffalo |
₹1 Crore Buffalo | एक कोटी रुपयांचा रेडा!
Published on: 
Updated on: 

जयपूर : राजस्थानातील पुष्कर मेळ्यात मुर्रा म्हशी आणि रेड्यांचीही मोठी चर्चा असते आणि यंदाही मुर्रा जातीचे रेडे मेळ्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर पुष्कर मेळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये घोड्यांबरोबरच अवाढव्य आकाराचे हे रेडेही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक रेडा मध्य प्रदेशातून आला असून, त्याचे नाव 'काला बादल' असे आहे. मालक शैलेंद्र चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या २० महिन्यांच्या वयात याचे वजन सुमारे ७६० किलो आहे. त्याची धिप्पाड शरीरयष्टी पाहण्यासाठी मेळ्यात लोकांची गर्दी होत आहे. याची किंमतही सुमारे एक कोटी रुपये सांगितली जात आहे.

यापूर्वी एका 'अनमोल' नावाच्या रेड्याच्या मालकाने त्याची किंमत ११ कोटी रुपये सांगितली होती आणि नंतर काही वृत्तांमध्ये ही किंमत त्याहूनही अधिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. सुमारे १,५७० किलो वजन असलेल्या या रेड्याला विकण्याऐवजी मालक त्याचा वापर प्रजननासाठी (ब्रीडिंग) करत होते. 'अनमोल'पासून आतापर्यंत सुमारे १५० रेडकं जन्माला आल्याचा दावा मालकाने केला होता. मुर्रा म्हैस दुग्ध उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम जातींमध्ये गणली जाते. हरियाना आणि पंजाबसह देशाच्या अनेक भागांत या जातीला मोठी मागणी असते. आपल्या म्हशींच्या पुढील पिढीतही चांगली दूध देण्याची क्षमता आणि उत्तम शारीरिक गुणधर्म यावेत, अशी पशुपालकांची इच्छा असते.

कृत्रिम गर्भधारणा म्हणजेच आर्टिफिशियल इनसेमिनेशनद्वारे मुर्रा जातीच्या रेड्यांच्या वीर्याचा वापर म्हशींच्या गर्भधारणेसाठी केला जातो. या तंत्रज्ञानामुळे चांगल्या जातीच्या रेड्याचे आनुवंशिक गुणधर्म दूरवरच्या भागांपर्यंत पोहोचवणे शक्य होते. काही पशुपालक रेड्याच्या वीर्यविक्रीतून दरमहा ७० ते ८० हजार रुपयांपर्यंतही कमाई करतात. मात्र, ही कमाई प्रत्येक रेड्याच्या बाबतीत सारखी नसते. ती त्याची प्रजाती, प्रजनन क्षमता, वीर्याची गुणवत्ता आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असते. हेच कारण आहे की, पुष्कर मेळ्यात येणाऱ्या काही रेड्यांसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागत असूनही त्यांचे मालक त्यांना विकायला तयार होत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.