

लंडन : जपानमध्ये अनेक शतायुषी लोक पाहायला मिळतात. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सकस, योग्य प्रमाणातील आहार आणि शारीरिक सक्रियता आहे, हे अनेकांना ठाऊक असेल. जपानशिवाय अन्यत्रही जगभरात अनेक लोक 100 वर्षांच्या पुढेही उत्साहाने जीवन जगताना दिसतात. त्यांच्या जीवनशैलीने प्रेरित होऊन अनेकांना तितकंच दीर्घ आणि स्वस्थ आयुष्य जगायची इच्छा होते. अलीकडेचब्रिटनमध्ये राहणार्या टेलर ब्राउनने तिच्या 99 वर्षीय आजी बर्नी हिचा एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. बर्नी फेब्रुवारी 2026 मध्ये 100 वर्षांची होणार आहे; पण आजही ती सहजपणे गुडघे टेकून फरशी पुसते, घरातील सर्व कामे करते आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येने सगळ्यांना आश्चर्यचकित करते. व्हिडीओमध्ये बर्नीने तिच्या दीर्घायुष्याची काही सोपी पण प्रभावी रहस्ये सांगितली, जी कोणीतरीही सहज पाळू शकते.
बर्नीनुसार दीर्घायुष्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे दिवसभर सक्रिय राहणे. वय कितीही वाढलं तरी ती शांत बसत नाही. दिवसाची सुरुवात हलक्या कामांनी करते. स्वयंपाक करणे, घर साफ करणे, छोटी कामे सांभाळणे, बागेत फिरणे : या सर्व गोष्टींमुळे तिचं शरीर सतत हलत राहतं. तिच्या मते, ‘जितकी तुम्ही हालचाल कराल, तितकं आयुष्य वाढतं आणि तितकंच शरीर ताजेतवाने राहते.’ बर्नी सांगते की, शरीर एकदा बसायला आणि आळशीपणाला सरावले की त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते. म्हणून वय वाढले तरी हालचाल थांबवू नये. हलका व्यायाम, चालणे, सोपी घरकामे करा.
बर्नी सांगते की, तिने कधीही डाएट केले नाही, कॅलरीज मोजल्या नाहीत किंवा अन्नावर बंधने घातली नाहीत. तिचं तत्त्व नेहमी एकच.. साधं खा, घरचं खा आणि कमी खा. तिच्या दैनंदिन आहारात ताज्या भाज्या, ओटमील किंवा हलका नाश्ता, फळे, सूप, घरी बनवलेलं साधं, मसालाविरहित अन्न असते. निसर्गाशी जोडलेले राहिल्यानेही निरोगी शरीर राखण्यास मदत होते, असे तिचे मत आहे. बर्नी म्हणते की, दीर्घायुष्याचे खरे रहस्य सकारात्मक विचार आणि हसण्यात आहे. ती म्हणते की, तिला प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद मिळतो आणि ती हसत राहते, ज्यामुळे तिचे विचार सकारात्मक राहतात. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी ती कोडी सोडवते, आठवणी लिहून ठेवते, विणकाम किंवा छोटी कामं करत असते.