लंडन : नव्या वर्षाचे स्वागत अनेक देशांमध्ये अनेक प्रकारे केले जात असते. त्यामध्ये काही जुन्या परंपरा, प्रथांचा भाग असतो. काही परंपरा तर आपल्याला अनोख्या वाटतील अशाही आहेत. कुठे घंटी वाजवून तर कुठे द्राक्षे खाऊनही नव्या वर्षाचे स्वागत होते.
ब्राझीलमध्येही नववर्षाचे स्वागत करण्याची अनोखी परंपरा आहे. या दिवशी लोक खाण्यावर अधिक भर देतात. याठिकाणी असेही मानले जाते की डाळ खाल्ल्याने घरात सुखसमृद्धी येते. जपानमध्येही नव्या वर्षाचे स्वागत करण्याची अनोखी पद्धत आहे. तिथे नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दिवसातून 108 वेळा घंटी वाजवली जाते.
घंटी वाजवणे हे तिथे शुभ मानले जाते. भारतातही घंटानाद शुभ मानला जातो. तसेच 108 हा अंकही शुभ मानला जातो. आपल्याकडे उपनिषदे 108 आहेत तसेच जपमाळेतील मणीही 108 असतात. आफ्रिकेत नव्या वर्षात आगळीवेगळी परंपरा पाळली जाते.
जोहान्सबर्गमध्ये लोक त्यांच्याकडे आवश्यक नसलेल्या वस्तू फेकून देऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे नवे वर्ष भरभराटीचे ठरते असे तिथे मानले जाते. स्पेनमधील लोक घड्याळात मध्यरात्री बारा वाजताच बारा द्राक्षे खाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. येणारे बारा महिने भाग्याचे ठरावेत असा त्यामागे भाव असतो.