

हैदराबाद : संपूर्ण भारतात खेड्यापाड्यांत, जंगलात, मंदिरांत आणि जुन्या रस्त्यांच्या कडेला अशी झाडे उभी आहेत, जी शतकानुशतके बदलत असलेल्या काळाचे साक्षीदार आहेत. वटा फाऊंडेशनचे संस्थापक उदय कृष्णा यांच्यासाठी या झाडांचा शोध घेण्याचा प्रवास कोणताही औपचारिक संवर्धन प्रकल्प म्हणून सुरू झाला नव्हता. याची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये एका साध्या वैयक्तिक निर्णयाने झाली; त्यांनी या मोहिमेला ‘बिग ट्री क्वेस्ट असे नाव दिले. ते म्हणतात, “मला फक्त वेगवेगळ्या राज्यांतील सर्वात जुनी झाडे स्वतः डोळ्यांनी पाहायची होती. ती आणखी किती काळ टिकतील, हे कोणालाच ठाऊक नाही.” कुतूहलापोटी सुरू झालेल्या या गोष्टीचे हळूहळू भारतातील सर्वात जुन्या आणि महत्त्वपूर्ण वृक्षांचा शोध घेण्याच्या, त्यांची नोंद करण्याच्या आणि त्यांना समजून घेण्याच्या एका शाश्वत प्रयत्नात रूपांतर झाले.
गेल्या एका वर्षात कृष्णा यांनी 20 हून अधिक राज्यांमध्ये सुमारे 35,000 किलोमीटरचा प्रवास केला असून 130 पेक्षा जास्त प्राचीन वृक्षांचे दस्तऐवजीकरण केले आहे. दस्तऐवजीकरणासाठी निवडलेल्या झाडांसाठी स्पष्ट निकष लावले जातात. काही झाडांचे वय कार्बन डेटिंगद्वारे वैज्ञानिकद़ृष्ट्या निश्चित केले जाते. तर काही झाडे एखाद्या प्रदेशातील त्यांच्या प्रजातीतील सर्वात जुने किंवा सर्वात मोठे नमुने म्हणून ओळखली जातात. अनेक झाडे इतिहास, संस्कृती किंवा दीर्घकाळापासून चालत आलेल्या सामुदायिक वापराशी जोडलेली आहेत.
यामध्ये स्पिती व्हॅलीतील ज्युनियर वृक्षाचा समावेश आहे, जो 3,521 मीटर उंचीवर वाढणारा, 2,032 वर्षे जुना भारतातील सर्वात जुना ज्ञात वृक्ष आहे. तसेच कर्नाटकातील विजापूर येथील भारतातील सर्वात जुने चिंचेचे झाड (885 वर्षांहून अधिक जुने), ज्याला वारसा वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे; श्रीनगरमधील जगातील सर्वात जुना चिनार वृक्ष (900 वर्षे जुना) आणि विविध भूभागांत पसरलेली जुनी वडाची, सागाची, अर्जुनाची आणि बाओबाबची झाडे यांचा समावेश आहे. कृष्णा म्हणतात, “जेव्हा इतर सर्व काही बदलते, तेव्हा ते झाड एक संदर्भबिंदू बनते. वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारी ती एकमेव गोष्ट उरते.”
सरकारी स्तरावरही याबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. कृष्णा यांच्या मते, वन विभागालाही अनेकदा हे माहीत नसते की, त्यांच्या अधिकारक्षेत्रात एखादे ऐतिहासिकद़ृष्ट्या महत्त्वाचे किंवा विलक्षण जुने झाड उभे आहे. समस्या ही आहे की यांपैकी अनेक झाडे अधिकृत नोंदींमध्ये अद़ृश्य आहेत.
इतिहासाव्यतिरिक्त, ही झाडे महत्त्वाची पर्यावरणीय भूमिका बजावतात. ती विविध प्रजातींना आधार देतात, अनुवांशिक विविधता जतन करतात, माती आणि जलप्रणालीवर प्रभाव टाकतात आणि स्थानिक हवामान नियंत्रित करण्यास मदत करतात. कृष्णा नमूद करतात की, नवीन रोपे लावणे हे जुन्या झाडाची जागा घेऊ शकत नाही. “शतकानुशतके वाढत असलेल्या झाडाचा पर्याय वृक्षारोपण असू शकत नाही.”