‘त्या’ तार्‍याप्रमाणे सूर्य बनू शकतो धोकादायक! | पुढारी

‘त्या’ तार्‍याप्रमाणे सूर्य बनू शकतो धोकादायक!

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष अंतरावरील एका तार्‍याचे रौद्ररूप पाहिले आहे. या तार्‍यापासून निघालेले विनाशकारी सौरवादळ अत्यंत भयावह आहे. अशा स्वरूपाचे सौरवादळ आपल्या सौरमंडळातील तारा म्हणजेच सूर्यावरूनही निघू शकते व ते पृथ्वीला धोकादायक ठरू शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

वैज्ञानिकांनी पाहिलेल्या या तार्‍याला ‘ड्रॅकोनिस’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचा अर्थ ‘ड्रॅगन’. हा तारा अक्षरशः आग ओकत आहे. तो ड्रेको तारामंडळात स्थित आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणातील प्लाज्मा कणांच्या उत्सर्जनाला ‘कोरोनल मास इजेक्शन’ असे म्हटले जाते. असे उत्सर्जन वारंवार होत असते आणि ते अत्यंत वेगाने अंतराळात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचत असते.

या तार्‍याचे सौर वादळ एखाद्या आतषबाजीसारखे दिसून येत आहे. हे अतिशय चिंताजनक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या विनाशकारी सौरलहरी पृथ्वीलाही विळख्यात घेऊ शकतात. त्यांच्या तडाख्यात अनेक कृत्रिम उपग्रह जळून राख होऊ शकतात आणि अनेक शहरांमधील विजेचे ग्रीड नष्ट होऊ शकतात. फोन नेटवर्क, टेलिव्हिजनसारख्या गोष्टी ठप्प पडू शकतात. सूर्यावरील सौरवादळे प्रत्येक शंभर किंवा अधिक वर्षांनी निघून पृथ्वीच्या दिशेनेही येत असतात. अमेरिकेच्या कोलोरॅडो युनिव्हर्सिटीतील डॉ. यूता नोत्सू यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की अशा सौरवादळांचा पृथ्वी आणि मनुष्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.

Back to top button