Underground train tunnel | जमिनीखाली 8,040 फूट खोल, 57 किलोमीटर बोगद्यात धावणारी ट्रेन

Underground train tunnel | जमिनीखाली 8,040 फूट खोल, 57 किलोमीटर  बोगद्यात धावणारी ट्रेन
Underground train tunnel | जमिनीखाली 8,040 फूट खोल, 57 किलोमीटर बोगद्यात धावणारी ट्रेन
Published on
Updated on

लंडन : जमिनीवर वेगाने धावणार्‍या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणार्‍या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून धावणार्‍या रेल्वेचा प्रवासही केला असेल आणि ट्रेन भुयारात अद़ृश्य झाल्यावर लहानपणी टाळ्याही वाजवल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जात आहोत, जिथे ट्रेन एकदा भुयारात शिरली की 57 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यावरच बाहेर पडते! आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लांब आणि सर्वात खोल रेल्वे भुयार, गॉटार्ड बेस टनेलबद्दल. स्वित्झर्लंडमधील गॉटार्ड बेस टनेल हे जगातील सर्वात लांब आणि सर्वात खोल रेल्वे भुयार आहे.

हे भुयार इतके लांब आणि खोल आहे की ते तयार करण्यासाठी 17 वर्षे लागली. 2,400 ते 2,600 हून अधिक कामगारांनी दिवस-रात्र काम करून हे रेल्वे भुयार 2016 मध्ये तयार केले. हे रेल्वे भुयार स्विस आल्प्सच्या खालून जाते आणि उत्तर युरोप आणि दक्षिण युरोपला जोडण्याचे कार्य करते. या भुयारामुळे झुरिचहून मिलानचा प्रवास फक्त 3 तासांचा झाला आहे, ज्यासाठी पूर्वी 5 ते साडेपाच तास लागायचे. हे भुयार तयार करणे सोपे नव्हते. ते बनवण्यासाठी 3.1 कोटी खडक बाहेर काढावे लागले.

2,400 हून अधिक कामगारांनी काम केले आणि बांधकामादरम्यान 3 कामगारांचा मृत्यू झाला. गॉटार्ड बेस टनेल केवळ सर्वात लांबच नाही, तर 2,450 मीटर (8,040 फूट) खोलीतून जाणारे सर्वात खोल रेल्वे भुयार आहे. हे भुयार बनवण्यासाठी 12.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 1,06,346 कोटी रुपये) खर्च आला. या भुयारामध्ये गाड्यांचा वेग 200 ते 220 किमी प्रति तास असतो. दररोज 15,000 हून अधिक रेल्वे प्रवासी या भुयारातून ट्रेनने प्रवास करतात. या भुयारातून दररोज 65 प्रवासी गाड्यांशिवाय सुमारे 260 मालगाड्या देखील जातात.

मालगाड्यांचा वेग 250 किलोमीटर प्रति तास असतो. गॉटार्ड बेस भुयार विशेषतः मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे केवळ ट्रेनचा वेळच वाचत नाही, तर वाहतुकीचा खर्चही कमी होतो. तसेच प्रदूषण कमी होत असल्याने पर्यावरणाचेही संरक्षण होत आहे. 2023 मध्ये एका मालगाडीच्या अपघातामुळे हे भुयार बंद करण्यात आले होते. रेल्वे अपघातामुळे भुयाराचे मोठे नुकसान झाले होते, ज्याच्या दुरुस्तीसाठी एक वर्षाचा कालावधी लागला. 2024 मध्ये हे भुयार पुन्हा सुरू करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news