‘ओमायक्रॉन’ नावाचे चित्रपटही येऊन गेले आहेत! | पुढारी

‘ओमायक्रॉन’ नावाचे चित्रपटही येऊन गेले आहेत!

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

सुमारे दोन वर्षांपूर्वी नव्या कोरोना विषाणूने चीन व अन्य देशांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली त्यावेळी अनेकांचा असा समज झाला होता की ‘कोरोना’ नावाचा नवाच विषाणू आला आहे. मात्र, या नावाच्या विषाणूंचे एक कुळ आधीपासूनच विज्ञानाला माहिती होते व या कुळाशी संबंधित नवा विषाणू आला आहे हे अनेकांना ठावूक नव्हते.

कालांतराने या महामारीला कारणीभूत झालेल्या नव्या कोरोना विषाणूला ‘सार्स-कोव्ह-2’ असे वैज्ञानिक नाव देण्यात आले. आता त्याचेच एक नवे व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ‘ओमायक्रॉन’ हा शब्द एका ग्रीक मुळाक्षराच्या नावाचा आहे. अल्फा, बीटा, गॅमा, ओमेगा यासारखाच हा ‘ओमायक्रॉन’ आहे. विशेष म्हणजे ‘ओमायक्रॉन’ या नावाचे दोन चित्रपटही येऊन गेले आहेत!

या दोन चित्रपटांपैकी पहिला चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अर्थातच कोरोना विषाणूबाबत काहीही नव्हते. हा चित्रपट परग्रहवासीयांच्या कथेवर आधारित होता. एक परग्रहवासी पृथ्वीवरील एका माणसाचे शरीर धारण करतो जेणेकरून पृथ्वीविषयीची अधिक माहिती मिळावी आणि एलियन्सना पृथ्वीवर कब्जा करता यावा.

2013 मध्येही ‘ओमायक्रॉन’ हे नाव शीर्षकात असलेला चित्रपट आला होता. ‘द व्हिजिटर फ्रॉम प्लॅनेट ओमायक्रॉन’ असे नाव असलेल्या या चित्रपटात एलियन आणि विषाणू अशा दोन्हींचा संबंध होता. एक एलियन म्हणजेच परग्रहवासी जैविक विषाणू घेऊन पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीला वेठीस धरतो असे कथानक त्यामध्ये होते.

एक धाडसी महिला या आपत्तीमधून पृथ्वीला वाचवते असेही यामध्ये दर्शवले होते. ग्रीक अल्फाबेटस् म्हणजेच मुळाक्षरांची नावे अनेक व्हेरिएंटस्ना दिली जात असतात. डेल्टा व्हेरिएंटचे नावही लोकांना माहिती आहे. तसेच आता या नव्या व्हेरिएंटला ‘ओमायक्रॉन’ हे ग्रीक अल्फाबेटचे नाव देण्यात आले आहे.

Back to top button