

विंडहोक, नामीबिया : अंतराळातील अनेक रहस्ये आजही मानवाला थक्क करतात. असेच एक आश्चर्य नामीबियाच्या उत्तर भागात पाहायला मिळते. सुमारे 80,000 वर्षांपूर्वी आकाशातून पडलेला एक महाकाय उल्कापिंड (मेटिओराईट) आजही तिथे तसाच आहे. सामान्यतः शास्त्रज्ञ अशा गोष्टी अभ्यासासाठी प्रयोगशाळेत घेऊन जातात; मात्र हा दगड इतका जड आहे की तो हलवणे अशक्य झाले आहे. या विशाल उल्कापिंडाचे नाव होबा मेटियोराइट असे आहे.
1920 मध्ये नामीबियातील होबा वेस्ट फार्मवर जॅकोबस हर्मानस ब्रिटस् नावाचा शेतकरी शेत नांगरत असताना त्यांचा नांगर एका कडक वस्तूला धडकला. अधिक खोदाई केली असता त्यांना जमिनीखाली धातूचा एक प्रचंड मोठा तुकडा सापडला. हा तुकडा 2.7 मीटर लांब, 2.7 मीटर रुंद आणि सुमारे 0.9 मीटर जाड आहे, जो दिसायला एखाद्या मोठ्या टेबलसारखा वाटतो.
होबा हा जगातील सर्वात मोठा आणि एकाच तुकड्यात असलेला उल्कापिंड आहे. याचे वजन सुमारे 60 ते 66 टन आहे. हा उल्कापिंड प्रामुख्याने लोखंड (84 टक्के) आणि निकेल (16 टक्के) यांच्या मिश्रणाने बनलेला आहे.