

स्कोप्जे : पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी उत्तर मॅसेडोनियातील ‘तुंबा माझारी’ या प्राचीन गावातून एका विलक्षण मातीच्या मूर्तीचा शोध लावला आहे. ‘ग्रेट मदर’ म्हणून ओळखली जाणारी ही मूर्ती सुमारे 8,000 वर्षांपूर्वीची असून, तिचा आकार अश्मयुगीन घरांच्या रचनेशी साधर्म्य दर्शवणारा आहे. ही टेराकोटा (पक्की माती) पासून बनवलेली मूर्ती 15.4 इंच (39 सेंमी) उंच आहे. या मूर्तीची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
यामध्ये एक मानवी आकृती असून तिचे डोळे, नाक आणि केस स्पष्ट दिसतात. तिच्या कपाळावर तपकिरी रंगाचे अंश सापडले आहेत, जे कदाचित केसांच्या ‘बँग्स’ शैलीचे असावेत. या मूर्तीचा खालचा भाग एखाद्या चौकोनी पेटीसारखा किंवा घरासारखा दिसतो. या स्त्रीचे हात कोपरातून वाकलेले असून तिने आपले हात आपल्या खालच्या चौकोनी भागावर सपाट ठेवले आहेत. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, ही मूर्ती ज्या घरात सापडली ते घर इसवी सन पूर्व 5800 ते 5200 या काळात अस्तित्वात होते. मूर्तीचा खालचा भाग घरासारखा असल्यामुळे, ती जणू घराचाच एक भाग आहे आणि घरातून वर येऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत आहे, असे भासते.
या मूर्तीचा खालचा भाग पोकळ आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, याचा वापर ‘वेदी’ म्हणून केला जात असे, जिथे धूप, वाळलेली औषधी झाडे किंवा अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जात असावा. उत्तर मॅसेडोनियाच्या पुरातत्त्व संग्रहालयानुसार, अश्मयुगात स्त्रीची मुलाला जन्म देण्याची क्षमता आणि मातृत्व हे सुबत्ता किंवा ‘ग्रेट मदर’ देवतेशी जोडले गेले होते. ‘अशा प्रकारच्या अनेक मूर्ती युरोप आणि आशियामध्ये सापडल्या आहेत; परंतु माता आणि घर यांच्यातील हे अनोखे नाते दर्शवणारी ही विशिष्ट रचना केवळ ‘बाल्कन’ प्रदेशातच पाहायला मिळते. ज्या घरात ही मूर्ती सापडली, तिथे मातीची भांडी, कप आणि जग देखील मिळाले आहेत. यावरून त्या काळातील लोकांच्या राहणीमानाची आणि धार्मिक श्रद्धांची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या या ऐतिहासिक वस्तू पुरातत्त्व संग्रहालय, उत्तर मॅसेडोनिया येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.