

चंदीगड : हरियाणातील नारनौल एअरस्ट्रिपवर नुकताच एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. 80 वर्षीय डॉ. श्रद्धा चौहान यांनी तब्बल 10,000 फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करत एक नवा इतिहास रचला आहे. त्या आता टँडम स्कायडाईव्ह पूर्ण करणार्या भारतातील सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत. आपल्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे धाडसी पाऊल उचलून, जिद्द आणि धैर्याला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. डॉ. श्रद्धा चौहान या भारतीय लष्करातील एक अत्यंत प्रतिष्ठित अधिकारी, निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या आई आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी ही स्कायडायव्हिंग आपल्या मुलासोबतच केली. आई आणि मुलाने एकत्र विमानातून उडी घेतली आणि हा अविस्मरणीय क्षण कॅमेर्यात कैद झाला.
‘स्कायहाय इंडिया’ या भारतातील एकमेव प्रमाणित सिव्हिलियन ड्रॉप झोनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये डॉ. चौहान आपल्या मुलाच्या मदतीने स्कायडायव्हिंगची तयारी करताना दिसत आहेत. ब्रिगेडियर शेखावत त्यांना वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंगसाठी मदत करतात आणि नंतर सुरक्षा उपकरणे (सेफ्टी गिअर) घालतात. यानंतर दोघेही विमानात बसतात आणि काही क्षणांतच मोकळ्या आकाशात झेप घेतात. GoPro कॅमेर्यात कैद झालेली वार्याची झुळूक आणि आकाशातून खाली येतानाची थरारक द़ृश्ये अंगावर रोमांच उभी करतात.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘त्या आता टँडम स्कायडाईव्ह करणार्या भारतातील सर्वात वयस्कर महिला आहेत. एक आई. एक मैलाचा दगड. एक असा क्षण जो एक भरारी बनला. हिंमतीला वय नसतं. प्रेमाला उंचीचं बंधन नसतं.’ व्हिडीओमध्ये ब्रिगेडियर शेखावत म्हणतात, ‘त्या माझी आई आहेत. आज त्यांच्या 80 व्या वाढदिवशी मला त्यांच्यासोबत स्कायडाईव्ह करण्याचे सौभाग्य लाभले. वाढदिवसाच्या शुभेच्छा!’ यावर डॉ. चौहान यांनी मुलाच्या गालावर पापा घेत त्याचे आभार मानले. डॉ. चौहान यांना व्हर्टिगो (चक्कर येणे), सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस आणि पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. इतक्या शारीरिक समस्या असूनही त्यांनी हे धाडस दाखवले. यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘माझ्या मनात एक इच्छा होती की, विमानाप्रमाणे आकाशात उडावं. आज माझ्या मुलाने माझी ती इच्छा पूर्ण केली. हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.’