

अंकारा : तुर्कीचे सुल्तान कोसेन यांना 2009 मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्’ने जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती म्हणून मान्यता दिली. त्यांची उंची 8 फूट 2 इंच (243 सेंटिमीटर) मोजली गेली आहे. गेल्या 20 वर्षांत 8 फुटांपेक्षा जास्त उंची असलेले ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी 7 फूट 8.95 इंच उंची असलेल्या शी शुन यांचा विक्रम मोडला होता. मात्र, ही अवाढव्य उंची सुल्तान यांच्यासाठी केवळ विक्रम नसून, आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान ठरली आहे.
तुर्कीच्या अंकारामध्ये जन्मलेले सुल्तान लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळे होते. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांची उंची 5 फुटांपेक्षा जास्त झाली होती. ज्या वयात इतर मुले लहान असतात, तिथे सुल्तान गर्दीत उठून दिसायचे. आपल्याला सामान्य आयुष्य जगता येणार नाही, याची जाणीव त्यांना तेव्हाच झाली होती. सुल्तान यांची उंची त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रासाचे कारण ठरली. त्यांनी आपला अनुभव सांगताना काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या.
उंचीमुळे लहानपणी त्यांचे मित्र त्यांना घाबरायचे आणि लांब पळायचे. यामुळे त्यांना प्रचंड एकटेपणा जाणवू लागला आणि त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. त्यांना डोळ्यांच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. त्यांची पाहण्याची क्षमता मर्यादित झाली असून, ते केवळ समोरचेच पाहू शकतात. ‘मी जिवंत राहीन की नाही?’ या भीतीने त्यांना सतत ग््राासले होते. या अस्वस्थतेमुळे ते अनेकदा स्वतःला खोलीत कोंडून घेत असत. 8 फूट 2 इंच उंचीमुळे सुल्तान यांचे आयुष्य सामान्य माणसांसारखे नाही. त्यांना झोपण्यासाठी तीन बेड एकत्र जोडावे लागतात. प्रवासासाठी ते केवळ व्हॅन सारख्या मोठ्या गाड्यांचाच वापर करू शकतात.
कारण, साध्या कारमध्ये बसणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. सुल्तान कोसेन यांचे आयुष्य सोपे नसले, तरी त्यांनी आपल्या विक्रमाच्या माध्यमातून जगाला स्वतःची ओळख करून दिली. शारीरिक मर्यादा आणि मानसिक तणावावर मात करत त्यांनी दाखवून दिले की, माणूस कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही.