मशरुमसारखे दात असणारा 8 कोटी वर्षांपूर्वीचा जलचर
वॉशिंग्टन : अमेरिकेत टेक्सासमध्ये तब्बल 8 कोटी वर्षांपूर्वीच्या एका जलचर प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. या प्राण्याचा जबडा मशरुमसारख्या दिसणार्या मजबूत दातांनी भरलेला होता. हा दुर्मीळ मोसासॉर प्राणी वीस फूट लांबीपर्यंतही वाढू शकत असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे.
जबड्यात गोलाकार दातांची रांग
संशोधकांना अशा प्राण्यांचे दोन जबडे सापडले आहेत. या प्राण्यांना ‘ग्लोबिडेन्स अलाबामेन्सिस’ असे वैज्ञानिक नाव आहे. त्यांच्या जबड्यात गोलाकार दातांची रांग आहे. हे प्राणी आपल्या भक्ष्याला कसे मजबुतीने पकडत असत हे त्यावरून दिसून येते. हिल्सबोरोमधील ‘टेक्सास थ्रु टाईम’ जीवाश्म संग्रहालयातील मरीन पॅलिओंटोलॉजिस्ट बेथानी बर्क फ्रँकलिन यांनी सांगितले की, या प्राण्यांचे मशरुमसारखे दिसणारे दात भक्ष्यावर हल्ला करून त्याची शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरत होते. तसेच शंख-शिंपल्यांसारखे कठीण आवरण फोडण्यासाठीही ते उपयुक्त होते. 100.5 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशियस काळातील अखेरच्या टप्प्यात असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण सागरी जीव अस्तित्वात होते. त्यामध्ये डॉल्फिनसारख्या दिसणार्या इचथायोसॉर्स आणि लांब मानेच्या प्लेसिओसॉर्सचा समावेश होतो. मात्र, बदलते हवामान आणि सागरी इकोसिस्टीममधील बदलाचे ते बळी ठरले. मोसासॉर्स हे समुद्राच्या उथळ पाण्यातील मोठे शिकारी होते.


