खराब फोटोंना मिळणार नवसंजीवनी, ‘हे’ आहे नवे तंत्र | पुढारी

खराब फोटोंना मिळणार नवसंजीवनी, 'हे' आहे नवे तंत्र

चेन्नई : बर्‍याच वेळा जुनी छायाचित्रे भिजल्याने किंवा वाळवी लागल्याने खराब होत असतात. अशी कृष्णधवल छायाचित्रे जुन्या काळातील आठवणींचा मौलिक खजिनाच असतात. ती काही कारणांमुळे अशी खराब झाल्यावर अनेकांना वाईट वाटत असते. आता यावर आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी नवे तंत्र शोधले आहे.

त्यांनी अशा छायाचित्रांना नवजीवन देणारी नवी पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत इतकी परिणामकारक आहे की नव्या आणि जुन्या फोटोंमधील किंचितही फरक दिसून येत नाही. हे तंत्र विकसित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेण्यात आला आहे.

त्यासाठी संशोधकांनी न्यूजर नेटवर्क पॉवर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे तंत्र इतक्याच कारणासाठी उपयुक्त आहे असे नाही. जर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी टिपलेला व्हिडीओ किंवा फोटोमधील एखाद्या व्यक्तीची प्रतिमा अस्पष्ट असेल तर या तंत्राने तो स्पष्ट करता येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी फॉरेन्सिक चौकशीबरोबरच पोलिस दलास मदत होऊ शकते. डॉ. ए.एन. राजगोपालन यांनी हे तंत्र शोधले आहे. त्यांच्या इमेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर व्हिजन प्रयोगशाळेत आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या सहाय्याने अशा खराब झालेल्या छायाचित्रांना पुन्हा नव्याने तयार करण्यात यश आले आहे.

Back to top button