

मुंबई : जगभ्रमण करणाऱ्या लोकांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘‘प्रवास म्हणजे केवळ नवीन जागा पाहणे नव्हे, तर नवीन अनुभव आत्मसात करणे होय.’’ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या व्हिडीओमध्ये ७६ वर्षांचे एक आजोबा ज्या उत्साहाने बंजी जंपिंग करताना दिसत आहेत, ते पाहून तरुणही थक्क झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये हे वृद्ध गृहस्थ बंजी जंप करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे असल्याचे दिसत आहे. जिथे सामान्यतः तरुण लोकही इतकी उंची पाहून घाबरतात, तिथे हे आजोबा अगदी वेगळ्याच अंदाजात दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट एक छान हसू होते. सोशल मीडिया युजर्स या व्हिहीओला केवळ एक स्टंट न मानता, आयुष्य भरभरून जगण्याचा संदेश मानत आहेत. बंजी जंप सुरू होण्यापूर्वी काही सेकंद आधी तिथे संगीत वाजते. गाण्याचा आवाज ऐकताच आजोबा अचानक पूर्ण जोशात थिरकू लागतात. त्यांचा उत्साह पाहून तिथे उपस्थित असलेले क्रू मेंबर्सही त्यांच्यासोबत नाचू लागतात. आजोबांनी आपल्या डान्सने तिथल्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरली. त्यांचा हा बिनधास्त अंदाज पाहून तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला.
काही वेळातच तो ॲडव्हेंचर स्पॉट एखाद्या छोट्या उत्सवासारखा वाटू लागला. डान्स संपल्यानंतर आजोबा पूर्ण आत्मविश्वासाने प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकावर आले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सर्व आवश्यक सुरक्षा तपासणी पूर्ण केली आणि त्यानंतर आजोबांनी कोणतीही भीती न बाळगता थेट खाली झेप घेतली. त्यांची ही धाडसी उडी पाहून आजूबाजूचे लोक थक्क झाले. आजकाल लोक सुट्ट्यांमध्ये केवळ फोटो काढण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जात नाहीत, तर आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव शोधत असतात. बंजी जंप, स्कायडायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लाइडिंग यांसारख्या खेळांना मोठी पसंती मिळत आहे. बहुतेकांचा असा गैरसमज असतो की हे खेळ फक्त तरुणांसाठी आहेत. पण, या ७६ वर्षांच्या आजोबांनी दाखवून दिले की, जर आरोग्य साथ देत असेल आणि मन खंबीर असेल, तर वय कधीही अडथळा ठरत नाही.