

न्यूयॉर्क : एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा दात त्याच्या डोळ्यात बसवून द़ृष्टी परत आणता येईल, ही कल्पना एखाद्या विज्ञानकथेसारखी वाटते; पण कॅनडातील व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे राहणार्या 75 वर्षीय गेल लेन यांच्यासाठी ही केवळ कल्पना नसून, एक चमत्कारिक वास्तव ठरले आहे. दहा वर्षांच्या अंधारानंतर, एका अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा एकदा जग पाहता आले. त्यांनी आपला पती आणि लाडक्या कुत्र्याला पहिल्यांदाच पाहिले. गेल लेन यांची द़ृष्टी दहा वर्षांपूर्वी एका ऑटो-इम्यून डिसऑर्डरमुळे गेली होती. या आजारामुळे त्यांच्या डोळ्यांच्या कॉर्नियावर व्रण तयार झाले होते, ज्यामुळे त्यांची द़ृष्टी पूर्णपणे गेली; पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे आयुष्य बदलून गेले, जेव्हा त्या कॅनडामध्ये ‘ऑस्टियो-ओडोंटो केराटोप्रोस्थेसिस’ नावाची शस्त्रक्रिया करणार्या पहिल्या तीन व्यक्तींपैकी एक ठरल्या.
ही शस्त्रक्रिया ‘टूथ-इन-आय’ सर्जरी म्हणूनही ओळखली जाते. ही दोन टप्प्यांत केली जाणारी एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात रुग्णाचा एक निरोगी दात काढला जातो. त्याचे पातळ काप करून त्याला पॉलिश केले जाते आणि एक प्लेट तयार केली जाते. प्लेटमध्ये एक लहान छिद्र पाडून त्यात एक कृत्रिम कॉर्निया (प्रोस्थेटिक लेन्स) बसवला जातो. दात आणि लेन्सचे हे एकत्रित युनिट रुग्णाच्या गालामध्ये सुमारे तीन महिने ठेवले जाते. यामुळे त्याभोवती नवीन रक्तवाहिन्या आणि जोडलेल्या ऊती (कनेटिव्ह टिश्यू) तयार होतात. तीन महिन्यांनंतर, हे युनिट गालातून काढून डोळ्याच्या खोबणीत यशस्वीरीत्या प्रत्यारोपित केले जाते. ही शस्त्रक्रिया केवळ अशा रुग्णांसाठी केली जाते ज्यांच्या कॉर्नियाचे गंभीर नुकसान झाले आहे आणि मृत दात्याकडून कॉर्निया मिळवूनही द़ृष्टी परत येण्याची शक्यता नाही.
शस्त्रक्रियेनंतरच्या काही आठवड्यांत गेल यांची द़ृष्टी हळूहळू परत येऊ लागली. सुरुवातीला त्यांना फक्त प्रकाश आणि अंधार यातील फरक जाणवू लागला. त्यानंतर त्यांना हालचाली दिसू लागल्या, ज्यात त्यांच्या पार्टनरच्या ‘पायपर’ नावाच्या सर्व्हिस डॉगची आनंदाने हलणारी शेपटीही होती. जसजशी त्यांची द़ृष्टी सुधारत गेली, तसतसे त्यांना आपला कुत्रा आणि सभोवतालचे जग अधिक स्पष्ट दिसू लागले. त्यांनी आपला पती, ज्यांना त्या अंधत्व आल्यानंतर भेटल्या होत्या, त्यांना शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी पहिल्यांदाच पाहिले. एका मुलाखतीत गेल म्हणाल्या, मला आता अनेक रंग दिसत आहेत. मी बाहेरची झाडे, गवत आणि फुले पाहू शकते. पुन्हा एकदा या गोष्टी पाहू शकण्याचा अनुभव खूपच अद्भुत आहे. या चमत्कारिक शस्त्रक्रियेमुळे गेल आता त्या लहान-सहान गोष्टी करू शकतात, ज्या आपण गृहीत धरतो. पूर्वी कपड्यांचे रंग जुळवण्यासाठी त्यांना मदत घ्यावी लागत होती; पण आता त्या स्वतःचे कपडे स्वतः निवडू शकतात.
कॅनडामध्ये ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे. व्हँकुव्हरच्या माउंट सेंट जोसेफ हॉस्पिटलचे डॉ. ग्रेग मोलोनी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ. मोलोनी सांगतात, ही एक गुंतागुंतीची आणि विचित्र वाटणारी शस्त्रक्रिया आहे. आम्ही रुग्णाचा दात यासाठी वापरतो, कारण तो शरीराचाच एक भाग असल्याने शरीर त्याला सहजासहजी नाकारत नाही आणि तो कृत्रिम लेन्सला आधार देण्यासाठी पुरेसा मजबूत असतो.