

शिकागो : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजकीय वारशाची साक्ष देणारे आणि जगातील सर्वात महागडी राष्ट्राध्यक्षीय लायब्ररी ठरलेले 'ओबामा प्रेसिडेन्शियल सेंटर' अखेर लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. येत्या १९ जून रोजी, म्हणजेच अमेरिकेतील ऐतिहासिक 'जूनटींथ' मुक्तिदिनाचे औचित्य साधून हे भव्य केंद्र अधिकृतपणे जनतेसाठी खुले करण्यात येत आहे. गेल्या एका दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ८५ कोटी डॉलर्स (सुमारे ७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) खर्च आला आहे.
टॉड विल्यम्स आणि बिली त्सिएन या प्रसिद्ध वास्तुविशारदांनी डिझाईन केलेले हे केंद्र केवळ एक इमारत नसून, १९.३ एकरांमध्ये पसरलेला एक अवाढव्य परिसर आहे. पारंपरिक राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालयांच्या कल्पनेला छेद देत यामध्ये एक अत्याधुनिक संग्रहालय, सार्वजनिक कार्यक्रम केंद्र, भाजीपाल्याची बाग, एनबीए आकाराचे बास्केटबॉल कोर्ट आणि शिकागो पब्लिक लायब्ररीची एक नवी शाखा उभारण्यात आली आहे.
या मुख्य संग्रहालयाच्या आठव्या मजल्यावर 'स्काय रूम' नावाचा एक सुंदर कप्पा आहे, जिथून शिकागो शहर आणि मिशिगन सरोवराचे विहंगम दृश्य दिसते. याच खोलीच्या छतावर कलाकार इद्रिस खान यांची 'स्काय ऑफ होप' ही विलोभनीय कलाकृती साकारण्यात आली आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी सेल्मा (अलाबामा) येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणातील शब्द कोरण्यात आले असून, ते जणू प्रकाशाच्या दिशेने झेप घेताना दिसतात.
कला आणि संस्कृतीचा सुवर्णसंगम
या संपूर्ण परिसरामध्ये जगातील नामांकित ३० कलाकारांच्या कलाकृतींना स्थान देण्यात आले आहे. संग्रहालयात प्रवेश करताच ज्युली मेहरेतू यांची ८३ फूट उंच रंगीबेरंगी काचेची खिडकी लक्ष वेधून घेते. तसेच मार्क ब्रॅडफोर्ड यांनी शिकागोचा नकाशा दर्शवणारे 'सिटी ऑफ द बिग शोल्डर्स' हे भव्य चित्र साकारले आहे, जे शहराच्या इतिहासातील असमानतेवरही प्रकाश टाकते. याशिवाय, संग्रहालयात बराक ओबामा यांच्या २००८ च्या निवडणुकीतील ऐतिहासिक प्रचार मोहिमेच्या आठवणी, मिशेल ओबामा यांनी परिधान केलेले प्रसिद्ध डिझायनर कपडे आणि अमेरिकेतील नागरी हक्क चळवळींचे दुर्मीळ दस्तऐवज पाहायला मिळतात. विशेष आकर्षण म्हणजे, व्हाईट हाऊसमधील राष्ट्राध्यक्षांच्या 'ओव्हल ऑफिस'ची हुबेहूब प्रतिकृती येथे तयार करण्यात आली असून, तिथे अभ्यागतांना प्रत्यक्ष बसण्याचा अनुभव घेता येईल.
डिजिटल क्रांती आणि वाद
परंपरेला छेद देत, या केंद्राचे व्यवस्थापन सरकारी संस्थेऐवजी ‘ओबामा फाऊंडेशन’ या खासगी संस्थेकडे असेल. तसेच ओबामा यांच्या कार्यकाळातील तब्बल ३ कोटी पानांचे दस्तऐवज पहिल्यांदाच संपूर्णपणे डिजिटल केले जात आहेत. अर्थात, या प्रकल्पाला काही वादांचाही सामना करावा लागला. ऐतिहासिक 'जॅक्सन पार्क'मधील शेकडो झाडे आणि १९३७ चे ऐतिहासिक 'विमेन्स गार्डन' यामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणवादी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ओबामा फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्हॅलेरी जॅरेट यांनी स्पष्ट केले की, ‘आम्ही स्थानिक नागरिकांशी हजारो बैठका घेऊन त्यांच्या गरजेनुसार खेळाची मैदाने आणि हिरवळीच्या जागा विकसित केल्या आहेत.’
आर्किटेक्ट बिली त्सिएन यांच्या मते, ही इमारत पुढील ५०० वर्षे टिकेल अशा विचाराने बांधली आहे. कलाकार थेस्टर गेट्स म्हणतात, ‘मला आशा आहे की जेव्हा लोक येथे येतील, तेव्हा ते लोकशाहीच्या भविष्याबद्दल आणि सामूहिक स्वप्नांबद्दल एक उबदार भावना मनात घेऊन बाहेर पडतील.’