

ब्युनोस आयर्स : अर्जेंटिनामधील रिओ नेग्रो, पाटागोनिया येथे अलीकडेच 7 कोटी वर्षे जुने डायनासोरचे अंडे सापडले आहे, जे इतक्या चांगल्या प्रकारे संरक्षित स्थितीत असल्याने संशोधकही आश्चर्य चकीत झाले आहेत. डायनासोरचे हे अंडे क्रेटेशियस काळाच्या उत्तरार्धातील आहे. मांसाहारी थेरपॉड डायनासोर वंशातील बोनापार्टेनिकस नावाच्या लहान डायनासोरचे असण्याची शक्यता आहे. याच वंशातून पुढे पक्ष्यांची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. रिओ नेग्रो या भागात डायनासोरचे जीवाश्म सापडणे असामान्य नसले, तरी मांसाहारी डायनासोरचे अंडे इतक्या चांगल्या स्थितीत सापडणे अत्यंत दुर्मीळ मानले जात आहे.
अर्जेंटिनातील नैसर्गिक विज्ञान संग्रहालयाचे गोन्झालो मुनोझ यांच्या मते, मांसाहारी डायनासोरची अंडी पक्ष्यांच्या अंड्यांप्रमाणे पातळ कवचाची असल्याने ती लवकर नष्ट होतात. त्यामुळे हा शोध विलक्षण आहे. पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते, या अंड्यामध्ये भ्रूण सामग्री असण्याची शक्यता आहे. हे निश्चित करण्यासाठी अंड्याचे सखोल स्कॅन केले जाणार आहेत. जर आतमध्ये वाढणार्या डायनासोरचे अंश सापडले, तर तो दक्षिण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा पुराजीवशास्त्रीय शोध ठरेल. यामुळे डायनासोरची वाढ आणि अंड्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया याबद्दल नवीन माहिती मिळू शकेल.
शोधमोहिमेदरम्यान तज्ज्ञांच्या चमूचे प्रमुख फेडेरिको अॅग्नोलिन यांना हे अंडे धुळीच्या पृष्ठभागावर आढळले. या ठिकाणाहून सस्तन प्राण्यांचे दात आणि सापांच्या मणक्यांची हाडे देखील सापडली. त्यामुळे रिओ नेग्रोचा हा भाग एकेकाळी डायनासोरचे अंडी घालण्याचे ठिकाण होते हे सूचित होते. हे अंडे आणि त्याची माहिती, निष्कर्ष पुढील अभ्यासासाठी अर्जेंटिना येथील नैसर्गिक विज्ञान संग्रहालयात पाठवले जाणार आहे.