Gossip Queen Granny | ऐकावं ते नवलच! ‘गॉसिप’ करून उभारली दोन आलिशान घरे

६७ वर्षीय ‘गॉसिप क्वीन आजी’च्या अनोख्या व्यवसायाने लोक थक्क
Gossip Queen Granny |
Gossip Queen Granny | ऐकावं ते नवलच! ‘गॉसिप’ करून उभारली दोन आलिशान घरे
Published on
Updated on

बोगोटा : काही रिकामटेकड्या लोकांना गावाच्या उचापत्या करण्याची खोडच असते. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोण कुठे जातंय, कोणाचं कोणाशी भांडण झालंय किंवा कुणाचं कुणासोबत अफेअर सुरू आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अशा लोकांना असते; पण याच उत्सुकतेला व्यवसायाचं रूप देऊन त्यातून लाखो रुपये कमावता येतील, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? कोलंबियातील ६७ वर्षीय मिरियम यांनी मात्र हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. शेजाऱ्यांच्या गॉसिप आणि खासगी आयुष्यातील बातम्या गोळा करून त्या विकणे हा त्यांचा चक्क व्यवसाय बनला आहे. विशेष म्हणजे, या अनोख्या कमाईतून त्यांनी दोन घरंही उभी केली आहेत!

मिरियम यांचं काम ऐकायला जितकं विचित्र वाटतं, तितकंच ते रंजकही आहे. त्या दररोज घराबाहेर एक खुर्ची टाकून बसतात आणि आजूबाजूला सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. मोहल्ल्यात कोण कुणाच्या घरी गेलं, कुणाचं कुणाशी भांडण झालं, कोण कुणाला लपून भेटतंय किंवा कोणाच्या घरात काही नवीन घडतंय, याची माहिती मिरियम गोळा करतात. सुरुवातीला ही केवळ त्यांची सवय होती; पण नंतर त्यांनी त्याच सवयीला कमाईचा मार्ग बनवलं. मिरियम स्वतःला अभिमानाने ‘प्रोफेशनल चिस्मोसा’ म्हणजेच व्यावसायिक ‘गॉसिप क्वीन’ म्हणतात. त्यांच्यासाठी चुगली हा निव्वळ टाइमपास राहिलेला नाही, तर तो एक व्यवस्थित व्यवसाय झाला आहे. त्यांच्याकडे गॉसिपची माहिती नोंदवण्यासाठी खास नोटबुकही आहे.

कोणती घटना कधी घडली, कोणाचा संबंध कुणाशी आहे, अशा अनेक गोष्टी त्या त्यात लिहून ठेवतात. एवढंच नाही तर त्यांच्या घरात एक खास ‘गॉसिप बोर्ड’देखील आहे. त्यावर लोकांचे फोटो, कागद आणि वेगवेगळ्या नोंदी लावलेल्या असतात. मिरियम प्रत्येक बातमी मोफत देत नाहीत. छोट्या-मोठ्या गॉसिपसाठी त्या साधारण ५ हजार ते १० हजार कोलंबियन पेसो आकारतात. मात्र, जर एखादं मोठं रहस्य असेल तर त्याची किंमतही मोठी असते.

मिरियम यांनी सांगितलेल्या एका प्रकरणात एका व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्यांनी तब्बल ७ लाख कोलंबियन पेसो म्हणजेच अंदाजे २१ हजार रुपयांना दिली होती. मिरियमच्या या व्यवसायामुळे अनेक शेजारी त्यांच्यावर नाराज असतात. आपल्या खासगी आयुष्याची माहिती त्या इतरांना सांगतात, अशी भीतीही काहींना असते. पण गंमत अशी की, जे लोक त्यांच्या गॉसिपच्या सवयीवर नाराज असतात, तेच एखादी चटपटीत माहिती हवी असेल तर मिरियमकडे धाव घेतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची मागणी कायम असल्याचं दिसून येतं!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news