‘जेम्स वेब’ने गुरूच्या चंद्रावर शोधले जीवसृष्टीचे संकेत | पुढारी

‘जेम्स वेब’ने गुरूच्या चंद्रावर शोधले जीवसृष्टीचे संकेत

वॉशिंग्टन ः आपल्या ग्रहमालिकेतील गुरू व शनी या दोन ग्रहांना 90 पेक्षाही अधिक चंद्र आहेत. या दोन्ही ग्रहांच्या काही मोठ्या चंद्रांचे सतत निरीक्षण केले जात असते. आता ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने गुरूच्या ‘युरोपा’ या बर्फाळ चंद्रावर जीवसृष्टीचे संकेत शोधले आहेत. या चंद्रावर तिथेच निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड असल्याचा छडा ‘जेम्स वेब’ ने लावला आहे. त्यामुळे तेथील गोठलेल्या पाण्यात जीवांना अनुकूल अशी स्थिती असावी, असा कयास लावला जात आहे.

गुरूचा ‘युरोपा’ हा चंद्र पृथ्वीच्या चंद्रापेक्षा किंचित लहान आकाराचा आहे. या चंद्रावर खार्‍या पाण्याचा महासागर असून त्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या बर्फाचा मोठा स्तर आच्छादलेला आहे. द्रवरूप पाण्याचे अस्तित्व असल्यामुळे युरोपा हा चंद्र नेहमीच खगोलशास्त्रज्ञांचा कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. पृथ्वीशिवाय अन्य ग्रह-उपग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या कार्यात या चंद्राचे स्थान नेहमी पुढे असते. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या पायाभूत घटकांमध्ये कार्बनचा समावेश होतो. मात्र, युरोपावरील महासागरात विशेषतः कार्बनचे योग्य रेणू असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आता याबाबत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने महत्त्वाचे संशोधन केले आहे. गुरूच्या या चंद्रावर एखाद्या उल्का किंवा लघुग्रहामार्फत कार्बन आलेला नसून तो या उपग्रहाची स्वतःचीच निर्मिती असल्याचा छडा ‘जेम्स वेब’ने लावला आहे. हा कार्बन युरोपावरील भूगर्भशास्त्रीयद़ृष्ट्या लहान वयाच्या असलेल्या ‘टारा रेजियो’ या भागात आढळून आला आहे. हा कार्बन डायऑक्साईड वायू युरोपामध्येच बनलेला असावा असे यावरून दिसून येते. याच भागात महासागरामुळे निर्माण झालेले क्षार किंवा मीठ असल्याचा शोध हबल या अंतराळ दुर्बिणीने लावला होता, अशी माहिती कॉर्नेल युनिव्हर्सिटी प्लॅनेटरी सायंटिस्ट समंथा ट्रम्बो यांनी दिली.

Back to top button