मुलांसाठी बनवलेल्या व्हिडिओनंतर बनले लोकप्रिय यूट्यूब चॅनेल | पुढारी

मुलांसाठी बनवलेल्या व्हिडिओनंतर बनले लोकप्रिय यूट्यूब चॅनेल

न्यूयॉर्कः

ऑरेंज कौंटी कॅलिफोर्नियामध्ये राहणार्‍या जे जियॉन आणि त्यांच्या पत्नीला आपल्या मुलांना कसे गुंतवून ठेवायचे हा प्रश्न पडला होता. त्यांच्याकडे चित्रपट निर्माण करण्याचा आणि लेखनाचाही अनुभव होता. त्यांची पत्नी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्रे काढत असे. या दोघांनी मिळून आपल्या मुलांसाठी काही व्हिडिओ बनवले. मुलांना ते अतिशय आवडले आणि यामधून प्रेरणा घेऊन त्यांनी नवे यूट्यूब चॅनेल सुरू केले. हा आहे ‘कोकोमेलन’चा अनोखा प्रवास.

जगभरातील अनेक मुलं कोकोमेलनमधील गाण्यांची चाहती आहेत. हे दुसर्‍या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल आहे. बडबडगीते आणि लहान मुलांसाठी असलेल्या अन्य गाण्यांचे तसेच अ‍ॅनिमेशनचे हे चॅनेल आहे. सध्या यूट्यूबवर या चॅनेलचे 12 कोटी सबस्क्रायबर आहेत.
सर्वात जास्त व्हिडिओ व्ह्यूजचा टप्पा या चॅनेलने गाठलेला आहे. इतकेच नव्हे तर यूट्यूबवरून बाहेर पडून हे चॅनेल आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला डंका वाजवत आहे. कोकोमेलनचा शो हा अमेरिकेत सर्वात जास्त काळ ‘टॉप टेनमध्ये राहणारा शो’ म्हणून ओळखला जात आहे. एक रांगणारे बाळ, त्याचे आईबाबा, योयो नावाची बहिण असे हे कुटुंब अतिशय लोकप्रिय आहे. बोबा, वॉली, एला, पेपे, मोची, किकी असा प्राण्यांचा मित्रपरिवारही यामध्ये आहे.

Back to top button