Perseverance Rover : मंगळावर ‘पर्सिव्हरन्स’ने बनवला श्वास घेण्यासारखा ऑक्सिजन | पुढारी

Perseverance Rover : मंगळावर ‘पर्सिव्हरन्स’ने बनवला श्वास घेण्यासारखा ऑक्सिजन

वॉशिंग्टन ः ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवर अनोखा प्रयोग केला आहे. या रोव्हरला मंगळभूमीवर श्वास घेता येण्यासारखा ऑक्सिजन तयार करण्यात यश आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून तो भविष्यातील मानवमोहिमेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. रोव्हरने या प्रयोगात इतका ऑक्सिजन बनवला की ज्याच्या सहाय्याने अंतराळवीर तीन तास श्वास घेऊ शकेल.

पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळभूमीवर फेब—ुवारी 2021 मध्ये उतरले होते. या रोव्हरने आता ‘मार्स ऑक्सिजन इन-सिटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट’ (मोक्सी) या उपकरणाच्या सहाय्याने हा ऑक्सिजन निर्माण केला आहे. दोन वर्षांच्या काळात वेळोवेळी कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर करीत हा ऑक्सिजन बनवण्यात आला. एखाद्या मायक्रोवेव्ह ओव्हनइतक्या आकाराच्या या रोव्हरने मंगळभूमीवर आल्यापासून 4.3 औंस म्हणजेच 122 ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती केली आहे असे ‘नासा’ने म्हटले आहे. एखादा छोट्या आकाराचा कुत्रा दहा तासांमध्ये जितका ऑक्सिजन घेतो तितका हा ऑक्सिजन आहे. या प्रयोगाच्या यशामुळे आता संशोधकांना भविष्यात मंगळभूमीवरील खडतर स्थितीत माणसाला ऑक्सिजन घेण्याची सोय निर्माण होऊ शकते असे वाटत आहे.

वॉशिंग्टनमधील ‘नासा’च्या मुख्यालयातील स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डिरेक्टोरेटमधील टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन्सचे संचालक ट्रूडी कोर्टीस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की मंगळावरीलच घटकांचा वापर करून उपयुक्त उत्पादने बनवण्यासाठी आम्ही ‘मोक्सी’सारखे उपकरण निर्माण करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यातील वैज्ञानिक मोहिमांसाठी हे अतिशय उपयुक्त ठरू शकेल. भविष्यात माणूस मंगळावरही जाईल हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे!

Back to top button