‘नासा’ने प्रसिद्ध केले गुरू ग्रहाचे थ्री-डी छायाचित्र | पुढारी

‘नासा’ने प्रसिद्ध केले गुरू ग्रहाचे थ्री-डी छायाचित्र

न्यूयॉर्क :

गुुरू हा आपल्या सूर्यमालेतील गॅसीय आणि सर्वात मोठा ग्रह आहे. उल्लेखनीय म्हणजे या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सूर्यालाही प्रभावित करते. गुरूचे लालसगर ढग हे संशोधनासाठी तमाम खगोलशास्त्रज्ञांना आकर्षित करत असतात. हे लालसर ग्रह म्हणजे गुरूवरील भीषण वादळे होय.

शास्त्रज्ञांनी नुकताच गुरू ग्रहाचा ‘थ्री-डी’ फोटो जारी केला आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘जुनो’ या यानाने पुरविलेल्या डाटाच्या मदतीने हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे. जुनो हे अवकाश यान गुरू ग्रहाभोवती दीर्घ काळापासून चकरा मारत आहे. यादरम्यान ते गुरूच्या रंगीबेरंगी ढगांबद्दल, तसेच अंतर्गत प्रक्रियांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. ‘सायन्स जर्नल’ आणि ‘जर्नल ऑफ जियोफिजिकल रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रात या ग्रहाच्या प्रकृतीबाबत सविस्तर
खुलासा करण्यात आला आहे.

‘नासा’च्या ‘प्लॅनेटरी सायन्स’ विभागाचे संचालक लोरी ग्लेज यांनी सांगितले की, जुनोने गुरूचे सखोल अवलोकन करून एक प्रकारे रहस्यमयी माहितीचा खजाना उघडला आहे.

लोरी ग्लेज यांनी दिलेल्या माहितीनुसार हे संशोधन गुरूच्या वातावरणातील वेगवेगळ्या प्रक्रियेंवर प्रकाश टाकते. खरे तर, गुरूवरील विशाल डाग हा सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. हा विशाल डाग म्हणजे आकाराने पृथ्वीपेक्षाही मोठ्या आकारातील वादळाचा भाग आहे.

Back to top button