लंडन : कोरोना महामारीने जगातील लाखो लोकांचा बळी घेतला. कोट्यवधी लोक संक्रमित झाले. या व्हायरसमुळे जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला. यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. काही लोकांनी आपले निकटवर्तीय, काही देशांनी आपल्या महान व्यक्तींना गमावले.
असेही लोक आहेत की, ते कोरानातून सहीसलामत बचावले. मात्र, जगात असे एक ठिकाण आहे की, तेथे कोरोना पोहोचलाच नाही.
युनायटेड किंगडमनजीक (युके) असे एक बेट आहे की, तेथे कोरोना व्हायरस पोहोचलाच नाही. यामुळे या बेटाला सध्या 'झिरो कोरोना केस आयलँड' नावाने ओळखले जात आहे. या बेटाचे अधिकृत नाव 'सेंट हेलेना' असे आहे. 2019 ते आजतागायात जगात कोट्यवधी लोक कोरोनाने संक्रमित झाले; पण सेंट हेलेना बेटावर एकही रुग्ण सापडला नाही.
सेंट हेलेना बेटाचे एकूण क्षेत्रफळ 121.7 चौरस किमी इतके असून लोकसंख्या सुमारे 5 हजार इतकी आहे. या बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला असताना या बेटावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे कसलेही नियम पाळले जात नाहीत. लोक येथे नेहमीप्रमाणे सामान्य जीवन जगत आहेत. येथे ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. मात्र, बाहेरून येणार्या लोकांसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.